इचलकरंजी : वस्त्रोद्योगातील मंदी, नगरपालिका निवडणूक, नोटाबंदी अशा समस्यांचा परिणाम येथील घरफाळा व पाणीपट्टी वसुलीवर झाला आहे. वसुलीची रक्कम ४४.६० कोटी रुपये असताना अद्यापपर्यंत १५ कोटी २ लाख रुपये इतकीच वसुली झाली आहे. परिणामी, अवघ्या पावणे दोन महिन्यात ९० टक्क्यांहून अधिक वसुलीचे आव्हान नगरपालिकेसमोर उभे आहे.नगरपालिकेच्या हद्दीतील असलेल्या मालमत्तांकडे घरफाळा आणि पाणीपट्टी यांची ३० कोटी ७७ लाख रुपयांची मागणी आहे. तर मागील १५ कोटी २३ लाख रुपयांची थकीत वसुली आहे. त्यापैकी १ कोटी ४० लाख रुपये नगरपालिकेच्या शाळा आणि पाणीपट्टीची पोकळ वसुली आहे. सदरची १ कोटी ४० लाख रुपयांची रक्कम थकबाकीतून रद्द करावी, अशा आशयाचा प्रस्ताव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे यांनी दिली. त्यामुळे ४४ लाख ६० हजार रुपये इतके वसूल करण्याचे आव्हान नगरपालिकेकडील कर वसुली खात्याकडे आहे.वस्त्रोद्योगात असलेल्या मंदीचा परिणाम कर वसुलीत झाला असताना नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका व त्यानंतर आलेली नोटाबंदी याचाही अनिष्ट परिणाम कर वसुलीवर होत आहे. त्यामुळे डिसेंबरअखेर ३९ टक्के इतकीच म्हणजे १३ कोटी ४९ लाख रुपये वसुली झाली होती. त्यानंतर आता नगरपालिकेने कर वसुलीकडे लक्ष दिले असून, जानेवारीअखेर ही वसुली १५ कोटी २ लाख रुपये एवढी वसुली झाली आहे. अशा स्थितीमध्ये यंदा चतुर्थ वार्षिक कर आकारणी करण्यात आली असून, घरफाळ्याच्या आकारणीमध्ये वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशा प्रकारच्या घरफाळ्यामध्ये झालेल्या वाढीबाबत नगरपालिकेने हरकती व सूचना मागविल्या आहेत. या हरकती व सूचना अपिलीय समितीसमोर ठेवून त्याची निर्गत करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)कर वसुलीसाठी तीन पथकेघरफाळा व पाणीपट्टी वसुली वेगाने करण्यासाठी कर वसुली खात्याकडे तीन पथके निर्माण केली आहेत. सुरूवातीच्या टप्प्यात ज्या मालमत्ताधारकांकडे एक लाखाहून अधिक रकमेची थकबाकी आहे, त्यांच्याकडे जाऊन वसुली करणे असे ध्येय ठेवण्यात आले आहे. मालमत्ताधारकांकडे गेल्यानंतर त्यांच्या शंकांचे निरसन करून थकीत रकमेची वसुली केली जात आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी नाईलाजास्तव पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई सुद्धा सुरू केले असल्याचे अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. म्हेत्रे यांनी स्पष्ट केले.प्रांताधिकाऱ्यांना वेळ नसल्याने वसुलीत घट१ घरफाळ्याच्या वाढीबाबत मागविण्यात आलेल्या हरकती व सूचनांविषयीची सुनावणी अपिलीय समितीसमोर होते. अपिलीय समितीचे अध्यक्ष प्रांताधिकारी असून, समितीचे सदस्य नगराध्यक्ष, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती, विरोधी पक्षनेता व नगररचना सहायक संचालक असतात. या समितीचे सचिव मुख्याधिकारी असतात. २ सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका सुरू असून, प्रांताधिकारी समीर शिंगटे निवडणुकीकडे कार्यरत आहेत. त्यामुळे अपिलीय समिती स्थापित झालेली नाही. आणि अपिलीय समितीच्या सुनावणीमध्ये वाढलेला घरफाळा कमी होणार असल्याच्या अपेक्षेमुळे मालमत्ताधारकांकडून घरफाळा भरला जात नाही. ३प्रांताधिकाऱ्यांकडे निवडणुकीतून अपिलीय समितीकडे लक्ष देण्यास वेळ नाही, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाल्याने घरफाळ्याची वसुली होत नाही, असे त्रांगडे निर्माण झाले आहे.
२९ कोटी कर वसुलीचे आव्हान
By admin | Published: February 07, 2017 11:14 PM