कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी दिवसभरात अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम पाऊस झाला. राधानगरी तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस झाल्याने गुऱ्हाळघर चालकांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. कोल्हापूर शहरात दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. आज, सोमवारी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.गेली दोन दिवस वातावरणात बदल झाला आहे. थंडी गायब होऊन ढगाळ वातावरण राहिले आहे. शनिवारी कोल्हापूर शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. रविवारी सकाळी आकाश दाटून आल्याने उष्मा वाढला होता. हवामान विभागाने २५ टक्के पावसाची शक्यता वर्तवली होती. सकाळी नऊनंतर आकाश स्वच्छ झाले, मात्र दुपारी बारा वाजता पुन्हा ढगांची दाटी झाली. राधानगरीसह अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.या पावसामुळे गुऱ्हाळघर मालकांची दमछाक झाली आहे. वीट व्यावसायिकांचीही तारांबळ उडाली आहे. किमान तापमान १९ तर कमाल ३० डिग्रीपर्यंत राहिले आहे. आज किमान तापमानात घसरण होऊन ते १७ डिग्रीपर्यंत राहील. हवामान विभागाने ४ टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे. उद्या, मंगळवारपासून ढगाळ वातावरण राहील मात्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही.
कोल्हापूर जिल्ह्यात आजही पावसाची शक्यता, थंडी गायब होऊन ढगाळ वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 1:38 PM