रवींद्र हिडदुगी -नेसरी -राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूर्वीच्या ‘गडहिंग्लज’ व आताच्या ‘चंदगड’ विधानसभा मतदारसंघासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी चालविली असून, विशेषत: विविध नेत्यांच्या मुलांनी उमेदवारी मिळविण्याच्या हालचाली गतिमान केल्या आहेत. -स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांना संधी मिळाल्याने पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा ‘गड’ शाबूत राहिला. मात्र, बहुतांशी मातब्बर नेत्यांचा पाठिंबा मिळून देखील म्हणावे तसे मताधिक्क्य मिळाले नव्हते. याच संधीचा फायदा उठवत लोकसभेवेळी महायुतीने चंदगडमध्ये १९,४५८ चे मताधिक्क्य मिळविले, तर पोटनिवडणुकीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजेंद्र गड्यान्नावर यांना मिळालेली ६८,६३९ मते सर्वांना धक्का देणारी ठरली. -मात्र, पोटनिवडणुकीनंतर महाराष्ट्रात महायुती अस्तित्वात आली. त्यामुळे स्वाभिमानीला भाजप-सेना व आरपीआय (आठवले)च्या साथीने चंदगडमध्ये बाजी मारता आली.सध्याचे चित्र आघाडीविरुद्ध महायुती असेच राहील की, काँग्रेस-राष्ट्रवादी वेगवेगळी लढेल यावर बरेच काही अवलंबून आहे. त्यातच संग्रामसिंह कुपेकर यांनी राष्ट्रवादीने तिकीट कापले तरी मागे हटणार नाही, असा पवित्रा घेतला असल्याने त्यांची उमेदवारी एक औत्सुक्याचा विषय ठरेल. कारण आमदार संध्यादेवी कुपेकर पुन्हा एकदा निवडणुकीत उतरण्याची दाट शक्यता आहे.दरम्यान, माजी मंत्री भरमू सुबराव पाटील यांनी काँग्रेसशी जवळीक वाढविली आहे. ते ही उमेदवारीच्या रांगेत आहेत. तर ‘गोडसाखर’चे माजी संचालक बाबूराव गुरबे यांचे चिरंजीव युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विद्याधर गुरबे यांनी जोरदार मोहीम राबवून आपणही निवडणुकीच्या रिंगणात आहोत्,ा हे दाखवून दिले आहे. तर राष्ट्रवादीतील एक गट डॉ. नंदाताई बाभूळकर यांच्यासाठी आग्रही असल्याचे बोलले जाते. दरम्यान, जनता दलाचे नेते श्रीपतराव शिंदे हेही आपली कन्या स्वाती शिंदे-कोरी यांना निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच माजी आमदार स्वर्गीय तुकाराम कोलेकर यांचे पुत्र पंचायत समिती सदस्य अॅड. हेमंत कोलेकर व स्वर्गीय राजकुमार हत्तरकी यांचे पुत्र सदानंद हत्तरकी यांची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरणार आहे, तर माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे व्याही नरसिंगराव पाटील यांचे सुपुत्र महेश पाटील यांची मात्र महायुतीमुळे गोची झाली आहे. कारण हा मतदारसंघ स्वाभिमानीकडे गेल्याने राजेंद्र गड्यान्नावर व नितीन पाटील यांच्यात उमेदवारीसाठी धडपड सुरू आहे, तर शेतकऱ्यांच्या उसाच्या उर्वरित हप्त्यासाठी उपोषण सुरू केलेल्या रवींद्र पाटील यांनीही जागृत शेतकरी संघटनेच्या माध्यमाद्वारे आपली ओळख निर्माण केल्याने त्यांनाही विधानसभेचे वेध लागले आहेत.आगामी निवडणुकीत नेत्यांच्या पुत्रांचा बोलबाला राहिला, तर काँग्रेस, राष्ट्रवादी व महायुती अशा मुख्य लढती असल्या तरी संग्रामसिंह कुपेकर यांनी ऐनवेळी बंडाचे निशाण फडकविले, तर त्यांच्यासोबत इतर नेत्यांच्या पुत्रांनाही विधानसभेचे वेध लागले, तर वावगे ठरू नये.
नेते आणि त्यांची मुलेस्वर्गीय बाबासाहेब कुपेकर - डॉ. नंदाताई बाभूळकरभैयासाहेब कुपेकर (संचालक, केडीसीसी बँक) - संग्रामसिंह कुपेकर (जिल्हाध्यक्ष, रा.यु. काँग्रेस)श्रीपतराव शिंदे (माजी आमदार) - सौ. स्वाती शिंदे-कोरी (माजी नगराध्यक्षा, गडहिंग्लज)स्व. तुकाराम कोलेकर (माजी आमदार) - अॅड. हेमंत कोलेकर (सदस्य, पंचायत समिती गडहिंग्लज)बाबुराव गुरबे (माजी संचालक, गोडसाखर) - विद्याधर गुरबे (जिल्हा उपाध्यक्ष, युवक काँग्रेस)स्वर्गीय राजकुमार हत्तरकी (गोकुळ संघ) - सदानंद हत्तरकी (संचालक, गोकुळ)भरमू सुबराव पाटील (माजी राज्यमंत्री) - दीपक पाटील (संचालक, गोकुळ)नरसिंगराव पाटील (माजी आमदार) - महेश पाटील (सभापती, शिक्षण खाते, जिल्हा परिषद)बाबासाहेब देसाई-शिरोलीकर (ओम-साई, आघाडी) - तात्यासाहेब देसाई-शिरोलीकर (जिल्हा परिषद सदस्य, अडकूर), संभाजीराव देसाई (प्रमुख, ओमसाई)व्ही. बी. पाटील (माजी आमदार)- रवींद्र विठ्ठल पाटील (अध्यक्ष, जागृत शेतकरी संघटना)