नंदकुमार ढेरे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंदगड : वैद्यकीय सुविधा असलेल्या शहरापासून लांब अंतरावर असलेल्या चंदगड तालुक्यात वैद्यकीय सुविधांची वानवा आहे. तालुक्यात उपलब्ध असलेली सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे, ३३ उपकेंद्रे आणि एका ग्रामीण रुग्णालयातून मिळणाऱ्या आरोग्य सेवेवरच नागरिकांना अवलंबून राहावे लागत आहे. चंदगड ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या दवाखान्यात होणारे रूपांतर अद्याप झालेले नाही, तर ग्रामीण रुग्णालयातच मंजूर असलेले ट्रामा सेंटर जागेअभावी रखडले आहे.तालुक्यात माणगाव, अडकूर, कानूर, तुडिये, हेरे, कोवाड येथे आरोग्य केंद्रे आहेत. या आरोग्य केंद्रांतर्गत ३३ उपकेंद्रे आहेत. सहा आरोग्य केंद्रांच्या सुसज्ज इमारती आहेत. डुक्करवाडी, बसर्गे, जंगमहट्टी, अडकूर येथील उपकेंद्रांना जागेअभावी इमारती नाहीत. उर्वरित २९ उपकेंद्रांना इमारती आहेत. तुर्केवाडी येथे आरोग्य केंद्र मंजूर आहे; पण, अद्याप कामच सुरू झालेले नाही.संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेतलेल्या राजगोळी खुर्द येथील मंजूर आरोग्य केंद्राची इमारत उभी झाली असून, अद्याप हे केंद्र सुरू झालेले नाही. तालुक्यातील सहा आरोग्य केंद्रांत रुग्णांना चांगली सेवा मिळत आहे. माणगाव येथील आरोग्य केंद्राला उत्कृष्ट सेवेबद्दल डॉ. आनंदीबाई जोशी हा पुरस्कारही मिळाला आहे. बाह्यरुग्ण व प्रसूतीची संख्या पाहता प्रत्येक आरोग्य केंद्रात अजूनही शासनाने औषधांचा पुरवठा केला पाहिजे.० ते ५ वर्षांखालील बालकांचे लसीकरण, किशोरवयीन मुली, स्तनदा मातांची आरोग्य तपासणी, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिरे, आदी उपक्रम या आरोग्य केंद्रातर्फे राबविले जातात.याशिवाय पर्यवेक्षक, आरोग्यसेविका, सेवक, विस्तार अधिकारी, सहायक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, परिचर, आदी ५७ पदे रिक्त आहेत. रिक्तपदांमुळे कामाचा अतिरिक्त कामाचा ताण कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर पडत आहे.माणगाव, अडकूर, कानूर येथे एमबीबीएस पदवीधारक डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, कोवाड, तुडिये, हेरे येथे बीएचएमएस पदवीधारक कंत्राटी डॉक्टरांची नेमणूक केल्याने या आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी माणगाव, अडकूर, कानूर येथील डॉक्टरांना सेवा द्यावी लागत आहे.चंदगड येथे ग्रामीण रुग्णालयाद्वारे रुग्णांना चांगली सेवा दिली जात आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना ग्रामीण रुग्णालयाचाच आधार मिळत आहे. याठिकाणी बाह्य रुग्णांची संख्या पाहता या रुग्णालयाचे रूपांतर ५० खाटांच्या हॉस्पिटलमध्ये करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. मात्र, त्याच्या पाठपुराव्याची गरज आहे. याच रुग्णालयात ट्रामा सेंटर मंजूर आहे; पण जागेअभावी अद्याप सुरूच झालेले नाही. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मेडिकल सुपरवायझर, नर्स, आरोग्यसेवक, सेविका, तंत्रज्ञ, परिचर, आदी आठ पदे रिक्त आहेत.रुग्णांना बेळगाव, गडहिंग्लजचा आधारचंदगड तालुका हा राज्याचे शेवटचे टोक आहे. शहरापासून तालुका लांब असल्याने गंभीर आजारांसाठी तालुक्यातील नागरिकांना बेळगाव, कोल्हापूर व गडहिंग्लजवरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे चंदगडला ५० खाटांचे सुसज्ज असे हॉस्पिटल मंजूर व्हावे, अशी मागणी होत आहे.आणखी दोन केंद्रांची गरजतालुक्याचा भौगोलिक विस्तार पाहता तालुक्यात आणखी दोन नवीन आरोग्य केंद्रांची गरज आहे. माणगाव आरोग्य केंद्र हे गावापासून एक किलोमीटर अंतरावर वसले आहे. गाडीची कोणतीही सोय नसताना रुग्ण चालत जातात. येथील डॉ. ए. जे. पठाणे, आरोग्यसेविका व इतर कर्मचारी यांनी दिलेली सेवा यामुळे या आरोग्य केंद्राकडे रुग्णांची मोठी गर्दी असते. या आरोग्य केंद्राला आजपर्यंत डॉ. आनंदी जोशी पुरस्कार, उत्कृष्ट लसीकरण, उत्कृष्ट डॉक्टर, आदी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
चंदगडला ५० खाटांच्या हॉस्पिटलची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 11:42 PM