लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी चंदगड व आजरा तालुक्यातील सुमारे तीनशे ठरावधारकांना सत्तारूढ गटाने उचलले आहे. जिल्ह्यातच दोन रिसॉर्टवर त्यांना ठेवण्यात आले असून, आज शेजारी दोन तालुक्यातील ठरावधारकांना उचलण्याचे नियोजन आहे.
‘गोकुळ’ च्या निवडणुकीसाठी पॅनेलची घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. गेली तीन आठवडे गाठीभेटी सुरू आहेत, बहुतांशी जणांनी प्रत्येक ठरावधारकांची भेट झाली आहे. मतदानासाठी अवघे दहा दिवस राहिल्याने घडामोडी चांगल्याच वेगावल्या आहेत. ठरावधारक विरोधकांच्या हाताला लागू नयेत, यासाठी दोन्ही आघाड्यांकडून युद्ध पातळीवर मोर्चेबांधणी सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून बुधवारी चंदगड व आजरा तालुक्यातील सुमारे तीनशे ठरावधारकांना सत्तारूढ गटाने उचलल्याचे समजते. एका रिसॉर्टसवर या ठरावधारकांना ठेवले असून आज भुदरगड व राधानगरी तालुक्यातील ठरावधारकांना उचलण्याचे नियोजन केले आहे. दोन्ही तालुक्यातील किमान चारशे ठरावधारकांना नेले जाणार आहे. कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवरील एका सांगली जिल्ह्यातील नेत्याच्या रिसॉर्टवर ठरावधारकांची व्यवस्था केल्याचे समजते.
लॉकडाऊनच्या धास्तीने जिल्ह्यातच ठेवणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही क्षणी लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते. त्यामुळे ठरावधारकांना जिल्ह्याबाहेर नेणे जोखीमीचे आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमेवरच ठरावधारकांना ठेवण्याचे नियोजन दोन्ही आघाड्यांकडून सुरू आहेत.
विरोधी आघाडीची मोर्चेबांधणी
सत्तारूढ गटानेही ठराव उचलण्याची मोर्चेबांधणी केली असून, तसे निरोप आपल्या ठरावधारकांना दिले आहेत. तयार रहा, दोन दिवसात सहलीवर जायचे आहे, असे निरोप स्थानिक नेत्यांनी संबंधिताना दिले आहेत.
मोठ्या खोल्या असणाऱ्या रिसॉर्टसची निवड
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून ठरावधारकांना सुरक्षित ठेवण्याचे नियोजन केले आहे. मोठ्या खोल्या व जास्त ठरावधारक बसतील, अशा क्षमतेचे रिसॉर्टसची निवड केली आहे.