चंदगड : येथील चंदगड अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष व्ही. एस. वाली यांच्या देव रवळनाथ विकास आघाडीचा पराभव करत विरोधी चंदगड अर्बन विकास आघाडीने सात जागा जिंकत सत्तांतर घडविले. सत्ताधारी आघाडीला सहा जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत विद्यमान सात संचालकांना पराभवाचा धक्का बसला. हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले.काल झालेल्या मतदानामध्ये एकूण ८ हजार ५७१ मतदारांपैकी ४८८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. रवळनाथ देवालयाच्या यात्री निवासच्या सभागृहात सकाळी आठला मतमोजणीला सुरुवात झाली. प्रारंभी सर्वसाधारण गटाची मतमोजणी झाली. यामध्ये प्रथम सत्ताधारी गटाचे तीन व विरोधी गटाचे पाच उमेदवार निवडून आले. त्यानंतर भटक्या विमुक्त जाती, इतर मागास व महिला गटाची मतमोजणी करण्यात आली. या मतमोजणीमध्ये सत्ताधारी गटाचे तीन व विरोधी गटाचा एक उमेदवार निवडून आला. सत्ताधारी सहा व विरोधी सहा अशी बरोबरी झाली असताना उपस्थित असलेल्या समर्थक प्रतिनिधींचे हृदयाचे ठोके वाढले होते. दोन्हीही समर्थकांकडून फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण व जल्लोष सुरु होता. सर्वांत शेवटी अनुसूचित जाती-जमाती गटाची मतमोजणी सुरु झाली. लक्ष्मण कांबळे व शंकर देशमुख यांच्यामध्ये चुरस निर्माण झाली होती. शेवटच्या फेरीमध्ये विरोधी गटाचे देशमुख यांनी १९६५ मते घेत बाजी मारली. यावेळी सत्ताधारी सहा व विरोधी गटाने सात जागा मिळविल्याने या ठिकाणी सत्तांतर झाले.विद्यमान गफार मकानदार, अली मुल्ला, अमीर मुल्ला, फिरोज मुल्ला, इस्माईल शहा, सल्लाऊद्दीन नाईक या सहा उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. तर विद्यमान उर्मिला भातकांडे, राजेंद्र परीट, व्ही. एस. वाली, सचिन बल्लाळ, सुरेश सातवणेकर, दयानंद काणेकर हे सहा उमेदवार पुन्हा निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी ए. व्ही. गराडे यांनी उमेदवारांना निवडीचे पत्र दिले. (प्रतिनिधी)
चंदगड अर्बन बँकेत सत्तांतर
By admin | Published: June 10, 2015 12:24 AM