राम मगदूम
गडहिंग्लज : चंदगड ग्रामीण रुग्णालयातील उपलब्ध सेवा-सुविधा तोकड्या आहेत. त्यामुळे रुग्णांची ससेहोलपट होत आहे. त्यासाठी या रुग्णालयाचा दर्जा वाढवून ५० बेडचे अद्ययावत सर्वसोयीनियुक्त उपजिल्हा रुग्णालय सुरू करावे, अशी जनतेची मागणी आहे. १९८० च्या दशकात पश्चिम भागातील जनतेच्या उठावामुळेच चंदगडमध्ये ग्रामीण रुग्णालय सुरू झाले. त्यामुळे दुर्गम भागातील जनतेला आधार मिळाला. परंतु, सध्या वैद्यकीय अधीक्षकासह बालरोग तज्ज्ञ व औषध निर्मात्याचे पद रिक्त आहे. सर्व परिचारिका कंत्राटी तत्त्वावरील आहेत. त्यामुळे येथील रुग्णसेवेला मर्यादा आल्या आहेत.
चंदगड हे सुमारे १५ हजार लोकवस्तीचे तालुक्याचे ठिकाण आहे. वर्षापूर्वीच याठिकाणी नगरपंचायतीची स्थापना झाली आहे. तिलारीनगर, हेरे-पाटणे, फाटकवाडी-कानूरपासून अडकूरपर्यंतचे वाड्या-वस्तीवरील रुग्ण याठिकाणी उपचाराला येतात.
ग्रामीण रुग्णालयाची इमारतदेखील जुनी व अपुरी आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासह प्रशस्त इमारतीचीदेखील गरज आहे. दुर्गम आणि डोंगरी भागातील जनतेची मूलभूत गरज म्हणून या रुग्णालयाच्या श्रेणीवाढीला शासनाने तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी आहे.
----------------------------------
प्रतिक्रिया
आजुबाजूच्या खेड्यातील सुमारे १५० रुग्ण दररोज याठिकाणी उपचारासाठी येतात. परंतु, येथील सुविधा खूपच तोकड्या आहेत. त्यामुळे गर्भवती, अपघातग्रस्त व अत्यवस्थ रुग्णांचे हाल होत आहेत. गोरगरिबांना गडहिंग्लज-बेळगावला उपचारासाठी जाणे परवडणारे नाही. त्यामुळे चंदगडला उपजिल्हा रुग्णालयाची गरज आहे.
- शिवानंद हुंबरवाडी, नगरसेवक, चंदगड.
----------------------------------
* चंदगड ग्रामीण रुग्णालयातील बेड्सची संख्या ३० वरून ५० करावी. रिक्त सर्व जागा भरून दुर्गम भागातील जनतेला उपचाराची आधुनिक सेवा उपलब्ध करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू आहे.
- राजेश पाटील, आमदार, चंदगड.
----------------------------------
फोटो ओळी : चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयाची इमारत.
क्रमांक : ०५०३२०२१-गड-०८