बांबवडे : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रथम गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक लढवून दाखवावी व नंतर मला पाडण्याची भाषा करावी. कारण मी माझ्या स्वार्थासाठी कधी लढत नाही, शेतकऱ्यांसाठी लढतो, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. बांबवडे-ठमकेवाडी येथे खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड होते.यावेळी खासदार शेट्टी यांनी भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणावर जोरदार टीका केली. ५६ इंच छातीवाले पंतप्रधान देशाची गरज नसताना पाकिस्तानातून साखर व कांदा आयात करून आपल्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावतात. जमीन अधिग्रहण कायद्यात बदल करून शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घालतात. भाजपचे हे धोरण लक्षात येताच शेतकºयांच्या हितासाठी मोदींना विरोध करणारा मी पहिला खासदार आहे.मानसिंगराव गायकवाड म्हणाले की, आतापर्यंत आम्ही प्रवाहाच्या विरोधात काम केले. जनतेच्या मनात आहे तेच आता करणार असून, शेट्टी जोपर्यंत तुम्ही आघाडीत आहात, तोपर्यंत मानसिंगराव गायकवाड तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. यावेळी युवा नेते रणवीरसिंग गायकवाड, माजी सभापती महादेवराव पाटील, राजेंद्र गड्यान्नावर, पंडितराव शेळके, प्रकाश पाटील, भाई भरत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास जि. प.चे सदस्य विजय बोरगे, सागर शंभुशेटे, वसंत पाटील, शेखर येडगे, साजाराम चव्हाण, प्रकाश पाटील, गणपती पाटील, संग्राम खराडे, अवधूत जानकर आदी उपस्थित होते. उत्तम मोरे यांनी आभार मानले.
चंंद्रकांत पाटील यांनी प्रथम गावची निवडणूक लढवावी: राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 12:43 AM