एम. एम. गुरवशित्तुर वारुण : धरण परिसरात अतिवृष्टी सुरूच असल्याने चांदोली धरण ८१.२७ टक्के भरले आहे. आज बुधवारी सकाळी ११. ४५ मिनिटांनी धरण दरवाजामधून १५०० व विद्युत निर्मितीमधून ९११ असा एकूण २४११ क्युसेक विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळी झपाट्याने वाढ होत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.चांदोली येथील पर्जन्य मापक केंद्रावर गेल्या २४ तासात ७१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी आतापर्यंत एकूण १००० मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या दमदार पावसामुळे पाण्याची आवक वाढत आहे. धरणात १५९२६ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. सध्या धरणात २७.८६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होवून कोकरूड रेठरे बंधारा गेले आठ दिवस पाण्याखाली गेला आहे. पावसाच्या पाण्यामुळे ओढे, नाले मोठ्या प्रवाहित झाले आहेत. वारणा नदी तुडूब भरून वाहत असल्याते कोकरूड रेठरे बंधाऱ्याहून नदीचे पाणी वाढू लागल्याने शाहुवाडी व पन्हाळा तालुक्यातील रेठरे, वारणा, कोडोली, मालेवाडी, जोंधळेवाडी, गोंडोली या गावांना जाणारी वाहतूक गेली पाच दिवस बंद झाली आहे.यामुळे नागरिकांना तुरुकवाडी (ता शाहुवाडी) मार्गे प्रवास करावा लागत आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांना दहा ते बारा किलोमीटर अंतर पायपीट करावी लागत आहे. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे वारणा काठावरील शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे.
चांदोली धरणाचे दरवाजे उघडले; २४११ क्युसेक विसर्ग सुरू, सावधानतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 12:15 PM