कोल्हापूर : चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या विस्थापनानंतर शासनाच्या पर्यावरण आणि वनविभागाने नेमके काय काम केले, याचा वस्तुनिष्ठ अभ्यास शिवाजी विद्यापीठाने करावा, अशी विनंती श्रमिक मुक्ती दलाच्या शिष्टमंडळाने शनिवारी पर्यावरण विभागाच्या विभागप्रमुख डॉ. आसावरी जाधव यांच्याकडे केली. दरम्यान, वनविभागाने शनिवारपासून उदरनिर्वाह भत्ता वाटपाचे काम सुरू केले आहे.
आसावरी जाधव यांनी याबाबत कुलगुरू व मुख्य वनसंरक्षक यांना निवेदन देण्याची सूचना केली. वनखाते, पर्यावरण विभाग, समाजशास्त्र विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने हा अभ्यास करता येईल, असेही त्यांनी सुचवले. येत्या चार दिवसांत कुलगुरुंची भेट घेतल्यानंतर चांदोली अभयारण्यग्रस्त जिल्ह्यातील पर्यावरणवादी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आपली कैफियत मांडणार आहेत. यावेळी प्रा. अविनाश भाले, श्रमिक मुक्ती दलाचे कार्यकर्ते संपत देसाई, मारुती पाटील, विनोद बडदे, धोंडीबा पवार उपस्थित होते.
--