कोल्हापूर : चांदोली अभयारण्यग्रस्तांना ११ एप्रिलपर्यंत जमिनीचे वाटप सुरू केले नाही आणि २१५ हेक्टरचा निर्वणीकरणाचा प्रस्ताव मंजूर होऊन जमीन वाटपासाठी उपलब्ध झाली नाही तर लढ्याचा दुसरा टप्पा नव्या तीव्रतेने व दिशेने सुरू केला जाईल, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष भारत पाटणकर यांनी शुक्रवारी दिला.
दलाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात हा इशारा दिला आहे. गायरान जमीन वर्ग करण्याचे काम गेली तीन साडेतीन वर्षे भिजत पडले आहे. केंद्र व राज्य शासनाला एवढेच पर्यावरण प्रेम होते, तर आधीच जमीन उपलब्ध करून मग मूळ ठिकाणाहून अभयारण्यग्रस्तांना का हलवले नाही, २० वर्षांहून अधिक काळ लढूनही त्यांच्यावर ही वेळ आणणे हा क्रूरपणा आहे. निर्वाणीकरणाच्या प्रस्तावित जमिनींवर अतिक्रमण झाले आहे. ती हटवली जात नाहीत. दुसरीकडे अभयारण्याच्या नावाखाली पर्यटन व्यवसायातून पैसा मिळवला जात आहे. हा प्रकार म्हणजे मढ्यावरचे लोणी खाण्यासारखे आहे, पण आता अभयारण्यग्रस्त मढी होणार नाहीत ते स्वत:चा अधिकार बजावतील. आजवर वनविभागाने अभयारण्यग्रस्त व धरणग्रस्तांची झाडाझडती केली आहे आता हे दोघे मिळून जबाबदार यंत्रणेची झाडाझडती घेतल्याशिवाय राहणार नाहीत असे यात म्हटले आहे.
--