प्रकाश पाटील-- कोपार्डे--कुंभी-कासारीच्या गेल्या दोन पंचवार्षिक निवणुका एकतर्फी जिंकताना राजकीय व भौगोलिक परिस्थितीचा विचार करीत राजकीय वाटचाल करताना आमदार चंद्रदीप नरके यांनी रणनीतीचा वापर केल्याचे चित्र पाहायला मिळते. चुका टाळत विरोधकांना संयमाने हाताळण्याबरोबर स्वत:चा गट निर्माण करण्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीपासून स्थानिक स्वराज्य संस्था, शिखर संस्थात आपली स्वत:ची राजकीय ताकद निर्माण केली आहे. त्याचा फायदा आ. नरके यांना यावेळी झाल्याचे एकूण मताधिक्क्यातून स्पष्ट झाले.कुंभी-कासारी निवडणूक जाहीर होण्याअगोदर कार्यक्षेत्रात आ. चंद्रदीप नरके यांच्या विरोधात शाहू आघाडीच्या माध्यमातून एक तगडे पॅनेल देऊन आव्हान निर्माण केले जाणार, असे चित्र होते. त्याला २0१४ मध्ये नुकतीच झालेली विधानसभेची झालर होती. काँग्रेस गटातून आ. नरकेंचे राजकीय बळ असलेली संस्था काढून घेतल्यास त्यांचे खच्चीकरण करता येईल, असा विरोधकांचा कयास होता. त्यादृष्टीने काँग्रेस पर्यायाने शाहू आघाडीची गोळाबेरीज सुरू होती. शाहू आघाडीच्या काही नेत्यांनी संदीप नरकेंनी सुरू केलेल्या आ. नरकेंच्या विरोधी भूमिकेचा राजकीय फायदा घेण्यासाठी ही सत्तेची साठमारी करण्याचे तंत्र अवलंबिले. मात्र, ऐनवेळी राजकीय व वैचारिक मतभेद निर्माण झाले. त्यातच नेतृत्वाचा मुद्दा जो विरोधी आघाडीला कायम भेडसावत होता. त्यानेच डोके वर काढल्याने शाहू आघाडीत बिघाडी झाली. माघारीच्या शेवटच्या दिवशी लढण्याआधीच माघारी घेत मातब्बरांनी रणांगणातून पळ काढला. मात्र, याला सर्वस्वी पी. एन. पाटील यांना जबाबदार धरीत त्यांच्या डोक्यावर खापर फोडण्यात आले.‘कुंभी’ची निवडणूक बिनविरोध होणार, अशा हालचाली सुरू झाल्या. मात्र, बचाव मंचचे प्रमुख बाजीराव खाडे यांनी केवळ अर्ध्या तासात पूर्ण नसेना; पण पॅनेल तयार केले. १८0 गावांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या कुंभीच्या कार्यक्षेत्रात सभासदांपर्यंत पोहोचण्यासाठी आर्थिक, राजकीय पाठबळाबरोबर मनुष्यबळही कमी पडले.मात्र, आ. चंद्रदीप नरके यांनी याउलट आपल्या राजकीय वाटचालीत झालेल्या चुकांमधून सुधारणा करीत विरोधकांना व्यासपीठावर बसण्यासाठी राजकीय कुटनीतीचा वापर केला. विरोधाला विरोध न करता विरोध कसा मावळेल याचा विचार केला. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समितीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना संधी देऊन राजकीय गट गावागावांत तयार केले. विरोधकांबरोबर समझोता करीत व्यासपीठावर आणले. अनेक गावांत एकतर्फी नरके गटाबाबतच कुंभीच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले. यातून विरोधकही नाऊमेद होतानाचे चित्र पाहायला मिळाले.प्रगतीचा अहवालच आ. चंद्रदीप नरके यांनी झंझावती प्रचार दौरा करुन गावागावात कुंभीच्या सभासदांना विश्वासू राखण्याची प्रतिमा कायम टिकावी म्हणून आपण केलेल्या कुंभीतील प्रगतीचा अहवालच मांडला. एवढेच नाही तर एफ. आर. पी प्रमाणे सातत्याने जिल्ह्यातील नव्हे तर राज्यात उस उत्पादक सभासदांना उच्चांकी एफ.आर. पी. दिल्याचे ठासून सांगितले. यातून विरोधक मावळलेच त्याचबरोबर कुंभीच्या राखण्या म्हणजे नरके घराणे असे वारे वाहू लागले. याचा परिणाम कारखान्याच्या पॅनेलला मिळाला. ७५00 ते ९ हजार मताधिक्याने विजय मिळवत आ. चंद्रदीप यांनी आपल्या चौफेर राजकिय रणनितीचे दर्शन घडविले आहे.चुका टाळत विरोधकांना संयमाने हाताळले.स्वत:ची राजकीय ताकद निर्माण केली
चंद्रदीप नरकेंच्या मुत्सद्दी रणनीतीचा विजय
By admin | Published: December 30, 2015 9:39 PM