कोल्हापूर : संयुक्त जुना बुधवार पेठ फुटबॉल क्लबने अनपेक्षितपणे शिवाजी तरुण मंडळाचा १-० असा सडनडेथवर पराभव करत चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेच्या साखळी फेरीत प्रवेश मिळविला. जुना बुधवारच्या रोहन कांबळेचा बरोबरी करणारा गोल सामन्याला कलाटणी देणारा ठरला.शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत संयुक्त जुना बुधवार पेठ व शिवाजी तरुण मंडळ यांच्यात सामना झाला. सामन्याच्या प्रारंभापासून ‘शिवाजी’कडून करण चव्हाण-बंदरे, संदीप पोवार, संदीप गोंधळी, संकेत साळोखे, माणिक पाटील यांनी अनेक चढाया केल्या. मात्र, त्यांना ‘बुधवार’ची बचावफळी भेदता आली नाही तर बुधवार पेठकडून रोहन कांबळे, दिग्विजय सुतार, सचिन बारामते, मयूर शेलार यांनीही तितक्याच तोडीचा खेळ करत ‘शिवाजी’च्या गोलक्षेत्रात धडक मारली. मात्र, दोन्ही संघांना पूर्वार्धात गोल करण्यात यश आले नाही.उत्तरार्धात दोन्ही संघ आघाडी घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरले. त्यात ‘शिवाजी’कडून करण चव्हाण बंदरे, संदीप पोवार, तर बुधवारकडून रोहन कांबळे, दिग्विजय सुतार यांनी चढाया केल्या. मात्र, योग्य समन्वयांअभावी त्यांना गोल करण्यात यश येत नव्हते. सामन्याच्या ६८ व्या मिनिटाला ‘शिवाजी’कडून सनो पॅटसने दिलेल्या पासवर संदीप पोवारने गोलची नोंद करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, ही आघाडी काही मिनिटेच टिकली. ७१ व्या मिनिटास बुधवारकडून रोहन कांबळे याने गोलरक्षक पुढे आल्याची संधी साधत चेंडू अलगद जाळ्यात धाडला. त्यामुळे सामन्यात १-१ बरोबरी झाल्याने सामन्याची उत्कंठा आणखी वाढली तर गोलरक्षक अक्षय सावंतने ‘शिवाजी’च्या अनेक चढाया लीलया परतावून लावल्या.
अखेरीस दोन्ही संघांकडून आघाडी घेण्याचे जोरदार प्रयत्न झाले; पण अखेरीस सामना १-१ असा बरोबरीत राहिला. त्यामुळे पंचांनी टायब्रेकरचा अवलंब केला. त्यात ‘शिवाजी’कडून संदीप पोवार, आकाश भोसले, सनो पॅटसन, तर संयुक्त जुना बुधवारकडून सुशील सावंत, हरिष पाटील, दिग्विजय सुतार यांनी गोल केल्याने सामन्याचा निकाल सडनडेथवर गेला. त्यात जुना बुधवारकडून किरण कावणेकर, निखिल कुलकर्णी यांनी, तर शिवाजीकडून केवळ सिद्धेश यादव यास गोल करण्यात यश आल्याने हा सामना जुना बुधवारने सडनडेथवर जिंकत साखळी फेरीत प्रवेश केला.
सामनावीर - अक्षय सावंत (संयुक्त जुना बुधवार),लढवय्या खेळाडू - संदीप पोवार (शिवाजी)