कोल्हापूर : ओंकार जाधव, हृषिकेश मेथे-पाटील, जोशो जॉन्सन यांच्या गोलच्या जोरावर पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळावर ३-० अशी एकतर्फी मात करीत चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेची पुढील फेरी गाठली.शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत मंगळवारी पाटाकडील ‘अ’ व फुलेवाडी या दोन संघांत सामना झाला. ‘पाटाकडील’कडून हृषिकेश मेथे-पाटील, वृषभ ढेरे, ओंकार जाधव, जोशो जॉन्सन यांनी, तर रोहित मंडलिक, मंगेश दिवसे, अक्षय मंडलिक, संकेत साळोखे, संकेत वेसणेकर यांनी एकमेकांच्या गोलक्षेत्रात जोरदार चढाया केल्या. मात्र, दोन्ही संघांना पूर्वार्धात गोल करण्यात यश आले नाही.उत्तरार्धात दोन्ही संघ आघाडी घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरले. त्यात दुसऱ्याच मिनिटाला अर्थात ४२ व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकवर ओंकार जाधवने हेडद्वारे गोल करीत ‘पाटाकडील’ संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर फुलेवाडी संघाकडून रोहित मंडलिक याने ‘पाटाकडील’च्या गोलक्षेत्राबाहेरून मारलेला चेंडू विशाल नारायणपुरे याने हवेत उंचावून बाहेर काढला.या प्रयत्नानंतर ‘पाटाकडील’कडून वृषभ ढेरेच्या पासवर हृषिकेश मेथे-पाटील याने गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र ‘फुलेवाडी’चा गोलरक्षक जिगर राठोडने हे प्रयत्न परतावून लावले. ५८ व्या मिनिटाला पुन्हा वृषभ ढेरेने दिलेल्या पासवर हृषिकेश मेथे-पाटीलने अप्रतिम गोलची नोंद करीत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली.
या गोलनंतर फुलेवाडी संघाकडून रोहित मंडलिक, संकेत साळोखे यांनी आघाडी कमी करण्याचे प्रयत्न केले. मात्र, पाटाकडीलच्या भक्कम बचावफळीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. सामन्यादरम्यान ६८ व्या मिनिटास पाटाकडील ‘अ’कडून जोशो जॉन्सनने मध्य रेषेपासून आणलेल्या चेंडूवर गोलची नोंद करीत संघाला ३-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. अखेरीस याच गोलसंख्येवर सामनाही पाटाकडील ‘अ’ने जिंकत पुढील फेरीत प्रवेश मिळविला.
विशेष म्हणजे अटल चषक फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील संघ फुलेवाडीकडून पहिल्या फेरीतच पराभूत झाला होता. त्याचा वचपा पाटाकडील ‘अ’ने ३-० असा विजय मिळवत काढला. सामना संपल्यानंतर शिवाजी स्टेडियमच्या दारामध्ये हुल्लडबाज फुटबॉल शौकिनांमध्ये काही कारणावरून एकमेकांमध्ये जुंपली. त्यात पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानंतर हा वाद तिथेच मिटला आणि वातावरण नियमित झाले.