कोल्हापूर- राज्यातील ४३ हजार गावातील १ कोटी २७ लाख शेतकरी खातेदारांना येत्या गुढीपाडव्यापर्यंत ऑनलाईन सातबारा देण्याची घोषणा राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी येथे केली. ग्रामीण आणि शहरी भागातील ५०० स्क्वेअर फुट शासकीय जागेवरील अतिक्रमण अधिकृत करण्याचा निर्णय घेतला असून गावांचे गावठाण २०० मीटरने वाढविण्याचा निर्णयही शासनाने घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले. राजर्षी शाहू स्टेडियमवर प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभात ते बोलत होते.
सातबारा ऑनलाईन देण्याच्या कामास राज्य शासनाने प्राधान्य दिले असून आतापर्यंत राज्यातील ३० हजार गावाचं काम पूर्ण झालं आहे. उर्वरित १३ हजार गावांचे सात बारा ऑनलाईनचे काम येत्या गुढीपाडव्यापर्यंत पूर्ण करण्याचा मानस असून त्या दृष्टीने महसूल यंत्रणा गतिमान केली आहे. राज्यात ५ हजार तलाठी सज्जे आणि ५०० सर्कल वाढविण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला असून ५०० सज्यांच्या कार्यालयांचे बांधकाम सुरु केले आहे. याबरोबरच ग्रामीण आणि शहरी भागातील सवर्सामान्य माणसाला दिलासा देण्याच्या दृष्टीने ५०० स्क्वेअर फुट शासकीय जागेवरील अतिक्रमन अधिकृत करण्याचा निर्णय घेतला असून गावांचे गावठाण २०० मीटरनी वाढविण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हंटलं.