कोल्हापूर, दि. ५ : कोल्हापुरने यंदा डॉल्बीमुक्त मिरवणुकीचा इतिहास घडविलला आहे. दरवर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बीच्या थरथराटावर कोल्हापूरातील काही मोजकीच मंडळे नाचत गणेश विसर्जन चालत आली होती, मात्र यंदा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी डॉल्बीमुक्त गणेश विसर्जन मिरवणुकीवर भर दिला. कोल्हापूरातील गणेश विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ करताना चंद्रकांतदादांनी चक्क स्वत: ढोल ताब्यात घेउन डॉल्बीमुक्तीचा ढोल वाजविला.मानाच्या ‘श्री ’ च्या पालखीचे सारथ्य केल्यानंतर चंद्रकांतदादांना ढोल ताशा पथकाच्या तडतडाटामुळे ढोल वाजविण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी काही काळ ढोल वाजवत विसर्जन मिरवणुकीचा आनंद घेतला.आयुष्यातील ताणतणाव विसरून भक्तांना आपल्या भक्तीत लीन करणाºया लाडक्या गणपती बाप्पांना मंगळवारी कोल्हापुरकरांनी अखेरचा निरोप देण्यास सुरुवात केली आहे.
कोल्हापुरात श्री गणेशाच्या आगमनापासून वादाचा विषय ठरलेल्या डॉल्बीविरोधात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह पोलीस व जिल्हा प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका घेतल्याने यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी वाजणार नाही, याबाबत साशंकता उरली नाही.
डॉल्बीने होणाºया दुष्परिणामांविषयी वारंवार प्रबोधन करूनही कोल्हापुरातील काही मंडळांकडून ठरवून दरवर्षी डॉल्बी वाजविला जातो. अन्य मंडळांनी डॉल्बी नाही वाजविला तरी राजारामपुरीत तरी हमखास डॉल्बी वाजतोच असा आजवरचा अनुभव आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशाचे अत्यंत काटेकोरपणे पालन करीत पोलीस प्रशासनाने श्री गणेश आगमनाच्या दिवशीही राजारामपुरीतील मंडळांना डॉल्बी लावू दिलेला नाही. त्या दिवसापासून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह जिल्हा-पोलीस प्रशासनाने डॉल्बीविरोधात कंबर कसली.
पालकमंत्र्यांनी सर्व नियोजित दौरे, बैठका रद्द करून कोल्हापुरातच ठिय्या मारला आहे. सुरुवातीला झालेल्या बैठकीत मंडळांना कडक शब्दांत समज दिल्यानंतर पालकमंत्री डॉल्बी लावणाºया मंडळांना रोज भेटी देऊन त्यांंचे प्रबोधन करीत होते. पारंपरिक पद्धतीने मिरवणुका काढा; त्यासाठी वाटेल ती मदत केली जाईल, यासह मंडळांची वास्तू उभारणी यासारखी नियोजित कामेही करून देण्याचा शब्द दादांनी दिला आहे. एकीकडे, पोलीस अधिकारीही मंडळांच्या कार्यकर्त्यांना भेटत होते. त्यामुळे अनेक मंडळांनी यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लावणार नाही, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना लिहून दिले आहे.
दुसरीकडे, न्यायालयाच्या निर्णयानुसार मंडळांना दोन टॉप आणि दोन बेसची परवानगी द्या, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. कोल्हापुरात घडलेल्या गोष्टींचे राज्यात अनुकरण केले जाते, असा एक पायंडा आहे. गेल्या अकरा दिवसांपासून घडत असलेल्या या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या प्रारंभीच चंद्रकांतदादांनी डॉल्बीमुक्तीचा ढोल वाजविला आहे.
दरम्यान, डॉल्बीविरहित विसर्जन मिरवणुकीसाठी जिल्हा पोलीस प्रशासनाचीही जय्यत तयारी असून, रविवारी संध्याकाळपासूनच शहरातील चौकाचौकांमध्ये व मुख्य रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एवढे करूनही काही मंडळांनी डॉल्बी लावण्याचा प्रयत्न केलाच तर रस्त्यावर डॉल्बी दिसताक्षणीच जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. महानगरपालिकेतर्फेही पंचगंगा नदीघाट, इराणी खण, राजाराम बंधारा, राजाराम तलाव या महत्त्वाच्या जलाशयांच्या ठिकाणी विसर्जनाची सोय आहे.