Maharashtra Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत जाधव यांना ‘अदृश्य हातां’चे पाठबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 01:52 PM2019-10-04T13:52:51+5:302019-10-04T13:56:44+5:30
कोल्हापूर उत्तरचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात तगडा उमेदवार मिळत नसल्याचे सुरुवातीचे चित्र बदलण्याची शक्यता आहे. ऐनवेळी धावपळ करून काँग्रेसची उमेदवारी घेण्यामध्ये यशस्वी ठरलेले उद्योजक चंद्रकांत जाधव यांना अनेक ‘अदृश्य हात’ मदत करण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात तगडा उमेदवार मिळत नसल्याचे सुरुवातीचे चित्र बदलण्याची शक्यता आहे. ऐनवेळी धावपळ करून काँग्रेसची उमेदवारी घेण्यामध्ये यशस्वी ठरलेले उद्योजक चंद्रकांत जाधव यांना अनेक ‘अदृश्य हात’ मदत करण्याची शक्यता आहे.
सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी भाजपविरोधी भाषणांचा रोख ठेवला होता. त्यानुसार क्षीरसागर यांनीही कोल्हापुरात भाजपविरोधी ठाम भूमिका घेतली होती; मात्र लोकसभेच्या निकालानंतरही भाजपसमर्थक आणि क्षीरसागर यांच्यामध्ये परस्परविरोधी आरोप प्रत्यारोप सुरूच होते. या सर्व पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटीलच ‘उत्तर’मधून निवडणूक लढविणार अशी चर्चा होती. मधुरिमाराजे यांचीही उमेदवारीची चर्चा होती; परंतु या सर्व घडामोडीत एकीकडे राजेश क्षीरसागर यांची उमेदवारी जाहीर झाली तरी काँग्रेसचा उमेदवार ठरत नव्हता, अशी परिस्थिती होती. परंतु गेल्या चार दिवसांमध्ये घडामोडी घडल्या आणि चंद्रकांत जाधव हे काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यामध्ये यशस्वी झाले.
त्यांना या सर्व घडामोडींत काँग्रेसच्या नेत्यांचे चांगले सहकार्य मिळाले आहे; त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेनेतीलच क्षीरसागर यांचे पारंपरिक विरोधक यांच्यासह अनेक अदृश्य हात जाधव यांच्या पाठीमागे आपली ताकद उभी करण्याची शक्यता आहे. हे होत असताना ताराराणी आघाडीचे सत्यजित कदम जे गेल्या निवडणुकीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते, ते जनसुराज्यमधून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
जाधव हे उद्योजक असून, विविध औद्योगिक संघटनांशी त्यांचा चांगला संपर्क आहे. फुटबॉल क्षेत्रामध्ये तर त्यांनी अनेक स्पर्धा प्रायोेजक त्व घेणे, खेळाडूंना दत्तक घेणे, संघांना पाठबळ देणे, हे काम गेली अनेक वर्षे सुरू ठेवले आहे. जाधव यांचे राजकारणापलिकडील व्यक्तिमत्त्व या निवडणुकीत रंग भरण्याची शक्यता आहे.
चंद्रकांत पाटील युती धर्म पाळण्याचीच शक्यता
लोकसभेच्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांच्याविषयी आपुलकी जाहीरपणे व्यक्त करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी शेवटच्या टप्प्यात मात्र महाडिक यांच्याविरोधात टोकाची भूमिका घेऊन वातावरणनिर्मिती केली. जरी क्षीरसागर आणि त्यांच्यामध्ये काही खटके उडाले असले तरी भविष्यातील राजकीय वाटचालींचा विचार करून याहीवेळी उद्धव ठाकरे यांना बोलण्याची संधी न देण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे क्षीरसागर यांच्याच पाठीशी ताकद लावण्याची शक्यता आहे.