कोल्हापूर : राज्यात पावसाचा जोर वाढल्याने सर्वदूर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे, पूरग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करुन बचाव आणि मदत कार्यावर प्रशासनाने अधिक भर दिला आहे. पूरपरिस्थितीत प्रशासन पूर्ण सतर्क आणि सजग आहे, जनतेने घाबरुन न जाता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.गेल्या आवठवडयाभरापासून सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु असल्याने धरण प्रकल्पातून होणारा पाण्याचा विसर्ग, नद्यांना आलेला महापूर यामुळे जिल्हया-जिल्हयात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पूरपरिस्थितीत प्रशासन सतर्क असून धरण प्रकल्पामधील पाणीसाठा, धरण क्षेत्रात पडणारा पाऊस अणि नद्यांना आलेला पूर या साऱ्यांचा अभ्यास करुन धरण प्रकल्पातून पाणी सोडण्याचे नियोजन करण्याची सूचना पाटबंधारे विभाग आणि जिल्हा प्रशासनास केली आहे.
पूर परिस्थितीत सर्व यंत्रणांमध्ये समन्वय राखून जिल्हा प्रशासन काम करीत आहे. पूरबाधित जनतेला सुरक्षित ठिकाणी हलविण्याबरोबरच त्यांना आवश्यक सोई-सुविधा पुरविण्याचे निर्देशही प्रशासनास दिले असल्याचेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलविल्यानंतर त्यांच्या मदतीला विविध राजकीय पक्ष, सेवाभावी, स्वयंसेवी संस्था-संघटनांनी पूरग्रस्तांच्या मदतीला जाणे गरजेचे आहे. पाऊस कमी करणे हे आपल्या हातात नाही, मात्र पूरपरिस्थितीवर मात करणे आपल्या हातात असल्याने सर्वानी मिळून पूरपरिस्थितीवर मात करण्यात सक्रीय होऊया, असे आवाहनही त्यांनी केले.पूर परिस्थिती असली तरी जनतेने घाबरुन जाण्याचे कारण नाही, सर्व परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा शासन आणि प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत असून यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, एनडीआरफ कार्यरत असून पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाबरोबरच विविध सेवाभावी, स्वयंसेवी संस्था-संघटना पूरग्रस्तांसाठी बचाव आणि मदत कार्याला सक्रीय झाल्या आहेत. जिल्हयातील जनतेने घाबरुन न जाता सतर्कता बाळगून प्रशासनास सहकार्य करावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, पूराबाबतच्या वस्तुनिष्ठ माहितीसाठी तसेच पूरपरिस्थितीतील अडचणी, धोके याबाबत जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाशी टोल फ्री क्रंमाक 1077 वर संपर्क साधावा, असे आवाहनही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.