कोल्हापूर : काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानं रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या नेत्या काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी विजय मिळवला. जाधव यांच्या पत्नी जयश्री यांनी जवळपास १९ हजार मतांनी हे यश मिळवलं असून त्यांना ९६ हजार २२६ मतं मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांना ७७ हजार ४२६ मतं मिळाली आहेत. या निकालानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यावरुन, मंत्री जितेंद्र आव्हाड आणि आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली आहे.
उत्तर कोल्हापूर मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपनं ताकद पणाला लावली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ यांच्यासह बड्या नेत्यांची फौज भाजपनं कामाला लावली होती. मूळचे कोल्हापूरचे असलेले चंद्रकांत पाटील निवडणूक जाहीर झाल्यापासून कोल्हापुरात ठाण मांडून होते. मात्र तरीही भाजपला विजय मिळवता आला नाही. त्यामुळेच, चंद्रकांत पाटील यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरुन, जितेंद्र आव्हाड यांनी चंद्रकांत पाटील यांचा फोटो ट्विट केला आहे. त्यामध्ये, ते हिमालयात बसल्याचे दिसून येतात. या फोटोसह आव्हाड यांनी, दादा परत या... असे कॅप्शन दिलं आहे. तसेच, हा फुले-शाहू-आंबडेकर विचारांचा विजय असल्याचंही त्यांनी म्हटलं.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे आहेत. मात्र असं असूनही जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नाही, अशी चर्चा अनेकदा राजकीय वर्तुळात होत असते. त्यावर बोलताना पाटील यांनी थेट आव्हान दिलं होतं. 'आज चॅलेंज आहे आपलं. ज्याला वाटतं असेल त्यानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या विधानसभेच्या कोणत्याही मतदारसंघाचा राजीनामा द्यायचा. पोटनिवडणूक लावायची.. निवडून नाही आलो ना तर सरळ राजकारण सोडून हिमालयात निघून जाईन, असं पाटील म्हणाले होते. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
भाजपच्या पराभवानंतर चंद्रकांतदादा म्हणतात...
चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या पराभवानंतर प्रतिक्रिया दिली. उत्तर कोल्हापूरात आम्ही काय करणार आहोत ते आम्ही सांगितलं होतं. पूर येऊ नये, वाहतूककोंडी होऊ नये यासाठी भाजप काय करेल ते आम्ही जाहीर केलं होतं. पण मतदारांनी आम्हाला कौल दिला नाही. मतदारांचा कौल आम्हाला मान्य आहे, असं पाटील म्हणाले. भाजपचा पराभव झाला तर हिमालयात जाणार असं तुम्ही म्हणाला होतात, याची आठवण पत्रकारांनी त्यांना करून दिली. त्यावर मी काय करायचं ते मी आणि माझं श्रेष्ठी ठरवतील, असं पाटील यांनी सांगितलं.
मी निवडणूक लढलो नाही
मी निवडणूक हरलो तर हिमालयात जाईन असं म्हटलं होतं. आमचे नाना कदम लढले तर तुमच्या तोंडाला फेस आला, मी लढलो नाही असं सांगत महाविकास आघाडीच्या नेत्यांना चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे. ज्या झाडाला चांगले आंबे असतात त्यालाच दगडं मारली जाते. चंद्रकांत पाटील लढले असते तर तुम्हाला कुणाला उभं करायचा हा प्रश्न निर्माण झाला असता. संघटना उत्तमपणे निवडणूक लढली असं चंद्रकांत पाटलांनी सांगितले.