कोल्हापूर : राज्यातील विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्याचा कोणताही प्रस्ताव आपल्याकडे आलेला नाही अशी स्पष्टोक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी दिली. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चेनंतर याची खातरजमा करण्यासाठी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली.पाटील म्हणाले, राजीव सातव आणि शरद रणपिसे यांच्या निधनानंतरच्या पोटनिवडणुकांबाबत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्याकडून फोन आले. यानंतर आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार या निवडणुका बिनविरोध केल्या. परंतु आता तसा कोणताच प्रस्ताव नाही. राष्ट्रवादीचे या निवडणुकीत कुणीच उमेदवार नाहीत. कॉंग्रेस, शिवसेनेचे आहेत. पण त्यांच्याकडून काहीही प्रस्ताव नाही.निष्कारण वेळ आणि पैसा खर्च व्हावा अशी आमची भूमिका नाही. परंतु नागपूरला आम्ही ९० मतांनी आघाडीवर आहोत, धुळेची जागा एकतर्फी आहे, मुंबईत एकच जागा लढवतोय आणि जिंकणार, अकोला लढत आहे आणि कोल्हापुरात तुल्यबळ आहे. असे असताना आम्ही प्रस्ताव द्यायचा प्रश्नच नाही. मात्र आलाच तर विरोधकांचा प्रस्ताव काय आहे, हे पाहून निर्णय घेऊ.
विधान परिषद बिनविरोध होणार ?, चंद्रकांत पाटील म्हणाले, ..तर निर्णय घेऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 5:29 PM