कोल्हापूर : आम्हाला विरोधी पक्षात बसण्याची सवय आहे; कुणाला भीती दाखवता. भाजप सरकार पाडण्यासाठी काहीही करणार नाही; पण तुमच्या मरणानेच सरकार मरणार आहे. तुम्हाला दिलेल्या गाड्यांच्या टायर बदलायच्या आत लूटमार करून सत्तेत आलेले सरकार बदलेल, अशी जहरी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.भाजप महानगर जिल्हाध्यक्षपदी राहुल चिकोडे यांची निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पाटील यांनी अतिशय तिखट भाषेत आपला संताप व्यक्त केला.पाटील म्हणाले, आम्हाला विरोधी बाकावर बसण्याचा जनादेश आहे, असे पवार सांगत होते आणि सत्तेत जाऊन बसले. त्यानंतर त्यांची बोटेच स्वर्गात गेली. काय करू, अन् काय नको; अशी त्यांची अवस्था झाली; पण तुम्ही कुणाला भीती दाखवता? असा सवाल उपस्थित केला.ते म्हणाले, आम्ही एकच नेता मानला. एकच कार्यक्रम जाहीर केला; परंतु नंतर लाथ मारण्याचे काम शिवसेनेने केले आणि हे अनैतिक सरकार सत्तेवर आले. आम्ही अजूनही बाळासाहेब ठाकरे यांना नेता मानतो; पण पवारांनी सांगितले म्हणून पृथ्वीराज चव्हाण मंत्रिमंडळात नाहीत. त्यांनीच सांगितले म्हणून भास्कर जाधव यांना पद नाही. त्यांनीच सांगितले म्हणून तानाजी सावंत यांना पद नाही म्हणजेच शरद पवारांना आणि सोनिया गांधींना तुम्ही नेता मानले आहे, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.यावेळी संतापलेल्या पाटील यांनी हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनाही लक्ष्य केले. ते म्हणाले, मी काय काम केले म्हणून विचारता? टोल घालविण्यापासून ते विमानतळाचे काम सुरू करण्यापर्यंत काम केले. रस्त्यांची अनेक कामे केली. तीर्थक्षेत्र अंबाबाईसाठी निधी आणला. रात्रीनंतर दिवस येतो. पुढच्या काळात तोंड लपविण्याची वेळ येईल, असा इशारा पाटील यांनी दिला.