कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी विधान परिषदेचे आमदार असलेले चंद्रकांत पाटील यांनी तातडीने एक कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने पत्रकाद्वारे केली आहे.
पूर आणि पावसामुळे शहरातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींसह ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. या बैठकीत खासदार संभाजीराजे, खासदार संजय मंडलिक आणि माजी आमदार सतेज पाटील यांनी प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे. नगरसेवकही वार्षिक निधीतून प्रत्येकी ५० हजार रुपये देणार आहेत.
आपण सत्तास्थापनेच्या कामासाठी मुंबईत व्यस्त असल्यामुळे बैठकीला उपस्थित राहू शकला नाहीा, याची जाणीव आम्हाला आहे. परंतु, आपल्या शिल्लक आमदार निधीतील एक कोटी रुपयांचा निधी या रस्त्यांसाठी तातडीने द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून केंद्र सरकारकडे आपले वजन वापरून भरीव निधी कोल्हापूरसाठी द्यावा, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. पाटील यांच्या वैयक्तिक ई-मेलवर हे निवेदन पाठविण्यात आले आहे. पत्रकावर अशोक पोवार, रमेश मोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.