पेठवडगाव : पुणे पदवीधर निवडणुकीच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, कोल्हापूर जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा, शाहूवाडीचे तालुकाध्यक्ष दाजी चौगुले, पी. डी. पाटील, मुकुंद गावडे, योगेश परुळेकर यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
सध्या नव्यांचा सन्मान आणि निष्ठावंतावर अन्याय हे धोरण सुरू आहे. त्यामुळे भाजपच्या निष्ठावंतांमध्ये घुसमट होत आहे. त्यामुळे भाजप बचाओ यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.त्यांनी घेतलेली भूमिका अशी : पुणे पदवीधर मतदार संघ हा परंपरागत भाजपचा बालेकिल्ला असून या मतदार संघात दोन वेळा प्रकाश जावडेकर विजयी झाले असून तिसऱ्यांदा सुनील मोदी यांच्या बंडखोरीमुळे प्रकाश जावडेकरांचा अल्पमतांनी पराभव झाला. त्यानंतरच्या निवडणुकीत सत्ता नसतानाही निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जिवावर विजयाची परंपरा कायम ठेवली व गेल्या पंचवार्षिकमध्ये महाराष्ट्रात भाजपची सत्ता असूनही २०२० च्या पुणे पदवीधरचे भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला.
हा पराभव प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या ढिसाळ नियोजनामुळे झाल्याचे दिसून येते. निष्ठावंत व परिवारातील कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक निवडणूक प्रचार यंत्रणेत घेतले नाही. नको त्या लोकांच्या हातात प्रचार यंत्रणा दिली गेली. कार्यकर्त्यांच्या जिवावर यापूर्वी या मतदार संघात विजय मिळविल्यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला मंत्रिपद व पक्षाचे उच्चतम पद मिळाले. त्यामुळे या मतदार संघातील विजयाचे पक्षाच्या दृष्टीने महत्त्व होते.