लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरासमोरील स्फोटकांच्या तपासाचे काय झाले? याची घाई माझ्यासह महाराष्ट्राच्या जनतेला लागली आहे. ‘पिंजरा’ चित्रपटातील मारूती कांबळेचे काय झाले? याप्रमाणे या तपासाचे काय झाले? याचे उत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी द्यावे व मग माझ्यावर बोलावे, असा टोला ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, अंबानी यांच्या घरासमोर सापडलेली स्फोटके, त्याचा तपास परमवीरसिंगनी वाझेकडे देणे. त्यानंतर परमवीरसिंगनी शंभर काेटींचा केलेला आरोप, याबाबत महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात शंका आहे. वाझेची पोलीस कोठडी संपल्याने ‘एनआयए’ने त्यातील सत्य बाहेर आणले पाहिजे, एवढीच आपण मागणी केली. मात्र, त्यावर मुश्रीफांना एवढी घाई कशी?’ असे चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केले. पाटील हे राज्याचे मोठ्या खात्याचे मंत्री होते, त्यांच्याकडून एवढी अपेक्षा आहे. ‘पिंजरा’ चित्रपटातील मारूती कांबळेचे काय झाले? त्याप्रमाणे स्फोटक तपासाचे काय झाले? हे त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगावे. राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपचा असला, तरी त्यामध्ये ते कदापिही यशस्वी होणार नाहीत, असे मंत्री मुश्रीफ म्हणाले.