कोल्हापूर/मुंबई - भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे नाव राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकांसाठी चर्चेत होते. पण, त्यांना डावलण्यात आले. यानंतर पंकजा मुंडे यांचे समर्थक चांगलेच नाराज झालेत. रविवारी दुपारी बीडमध्ये विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या गाडीचा ताफा अडविण्यात आला. त्यानंतर, आता औरंगाबादमध्ये केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या ऑफीसबाहेर हाणामारी झाली आहे. याप्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
केंद्रीयमंत्री भागवत कराड यांच्या औरंगाबाद येथील ऑफीसबाहेर राडा झाला. यावेळी काही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीदेखील झाली. पंकजांच्या ज्या कार्यकर्त्यांनी यापूर्वी भाजप कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, त्यांनीच आज भागवत कराड यांच्या क्रांती चौकातील कार्यालयात राडा घातला. या घटनेवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. औरंगाबादमध्ये घडलेली घटना दुर्दैवी होती. पण, पंकजा मुंडेंवर खरे प्रेम करणारे कार्यकर्ते असतील तर ते अशी कृत्ये करुन पंकजाताईंची प्रगती रोखत आहेत, अशा शब्दात पाटील यांनी भूमिका मांडली. तसेच, पक्ष त्या गोष्टीत इंटरटेन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
कार्यकर्ते ताब्यात
भागवत कराड यांच्या ऑफीसबाहेर कार्यकर्ते राडा घालणार असल्याची माहिती आधीच भागवत कराड यांच्या कार्यकर्त्यांना लागली होती, त्यामुळे ते देखील तयारीत होते. यावेळी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलाच चोप देण्यात आला. या घटनेची पोलिसांनाही माहिती असल्याने, पोलिसांनी तात्काळ त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.