कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या राजकारणात आमदार विनय कोरे यांची भूमिका काय होती, ते काय करणार आहेत, हे जर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना माहिती नसेल, तर त्यांना जिल्ह्याचे राजकारणच कळलेले नाही. त्यांचे ज्ञान किती अगाध आहे हे त्यावरून स्पष्ट होते, असा टोला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांना पॅनलमध्ये घेण्यास आमदार कोरे यांचा विरोध होता, त्यामुळे त्यांना सोबत घेऊन संजय मंडलिक यांनी पॅनल केले. मग जिल्हा बँकेचा अध्यक्ष करण्यासाठी कोरे हे मंडलिक यांना पाठिंबा कसा देऊ शकतात..?एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेशी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे घनिष्ठ संबंध आहेत. राज्यात एखादा प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्यामध्ये त्यांनी भाग घेतला म्हणून भाजपच्या पोटात का दुखत आहे. पवार यांच्यामुळेच महाविकास आघाडी आकाराला आली आणि भाजपचे सत्तेचे स्वप्न भंगले, यामुळेच ते अस्वस्थ आहेत.
बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन-अडीच तास ऑनलाईन सहभागी झाले होते. त्यामुळे कदाचित डॉक्टरांच्या सल्ल्याने ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नसतील. मात्र, देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण असलेल्या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे त्या बैठकीला उपस्थित होते, मग त्यांना का बोलू दिले नाही, असा सवाल मुश्रीफ यांनी केला. मुख्यमंत्र्यांची शस्त्रक्रिया झाली आहे, अशा काळात त्यांना भाजप त्रास देत आहे, हे बरोबर नसल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.
सीपीआर बंद पडणार नाही
सीपीआरमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रश्नांबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याशी बोलणे झाले आहे. अधिकारीच हवे असतील तर इतर जिल्ह्यातील थोडेथोडे घ्या, असे सुचविले, ते त्यांनी मान्य केले आहे. तत्कालीन आरोग्यमंत्री स्वर्गीय दिग्विजय खानविलकर यांनी सीपीआर उभे केले आहे, ते कधीच बंद पडू देणार नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
त्याबद्दल आभार
हसन मुश्रीफ यांना केवळ कागलमधीलच कळतेय, असे चंद्रकांत पाटील म्हणतात. निदान कागलमधील कळतेय एवढे तरी त्यांना समजले याबद्दल त्यांचे आभार मानतो, असाही चिमटा मुश्रीफ यांनी काढला.