कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पूर्वी काय होते आणि गेल्या पाच वर्षांत सत्तेच्या काळात ते कोठे पोहोचले? एकंदरीत त्यांच्या पाच वर्षांतील कारभाराचीच चौकशी व्हावी, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी मंगळवारी येथे दिले.
दरम्यान, रविवारी (दि. १९) राजर्षी शाहू समाधी स्मारक स्थळ लोकार्पण सोहळा ‘लोकोत्सव’ म्हणून साजरा केला जाणार आहे. यामध्ये कोल्हापूरच्या जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर यांनी येथे केले.छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील राष्ट्रवादी कॉँगे्रेसच्या शहर कार्यालयात राजर्षी शाहू समाधी स्मारक स्थळ लोकार्पण सोहळा व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या दौऱ्यानिमित्त नियोजनासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती जिल्हा बॅँकेचे माजी संचालक व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, माजी उपमहापौर परीक्षित पन्हाळकर, माजी नगरसेवक राजेश लाटकर, जिल्हा सचिव मधुकर जांभळे, अनिल कदम, बाबा जगताप, अमरसिंह पाटील, नगरसेवक सचिन पाटील, आदींची होती.मंत्री मुश्रीफ यांनी लोकवर्गणीतून कारखाना काढला आहे; तर सतेज पाटील यांची संपत्ती ही वडिलोपार्जित आहे. त्यामुळे चौकशी करायचीच असेल तर ती चंद्रकांत पाटील यांच्या गेल्या पाच वर्षांतील कारभाराचीच झाली पाहिजे, असे ए. वाय. पाटील म्हणाले.
पक्षाच्या जिल्हा कार्यालयासाठी राजारामपुरी व शाहू मार्केट यार्ड येथील इमारतींची पाहणी केली आहे. त्यांपैकी एक ठिकाण निश्चित केले जाईल, असे ते म्हणाले. महापौर लाटकर, आर. के. पोवार, राजेश लाटकर यांनी मनोगत व्यक्त केले. सुनील देसाई यांनी स्वागत केले. मधुकर जांभळे यांनी आभार मानले.