लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये महाविकास आघाडी आकारास येत असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सत्तारूढ गटाला देऊ केलेल्या पाठिंब्याने एक प्रकारे खो बसला. एकीकडे सचिन वाझे प्रकरणात प्रदेशाध्यक्ष पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणत असताना या घडामोडीने बिघाडी झाली. शिवसेनेला किती जागा मिळतात यापेक्षा विरोधी आघाडीसोबत जाण्याचे फर्मान थेट ‘मातोश्री’वरून आल्याने अनेकांची गोची झाली.
राज्यात अनपेक्षितपणे सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीमुळे जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणेच बदलून गेली आहेत. त्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचे असल्याने काॅंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेतृत्व त्यांची कोंडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत महाविकास आघाडी आकारास यावी, यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे पहिल्यापासून प्रयत्नशील होते. काॅंग्रेस, शिवसेनेच्या सर्व नेत्यांना सोबत घेऊन तगडी आघाडीची बांधणी सुरू होती. त्यासाठी त्यांनी सर्वच नेत्यांची चर्चा सुरू केली. मात्र, ही चर्चा सुरू असताना सत्तारूढ गटाचे संचालक प्रचारात सक्रिय होते. त्यात सत्तारूढ गटाकडून राष्ट्रवादीला दोन व पालकमंत्री सतेज पाटील यांना एका जागांची ऑफर दिली. मागील निवडणुकीत संपुर्ण पॅनेल उभे करून दोन जागांवर विजयी मिळवणाऱ्या मंत्री पाटील यांच्या हा प्रस्ताव चांगलाच जिव्हारी लागल्याने आघाडीमधील दरी रूंदावत गेली.
राज्यात सचिन वाझे प्रकरणामुळे महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले आहे. विरोधी भाजप सरकारला घेरण्याची एकही संधी सोडत नाही. त्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आघाडीवर आहेत. कोल्हापूरात प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पत्रकार परिषद घेत वाझे प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्याचवेळी ‘गोकुळ’ मध्ये आपण सत्तारूढ गटाला पाठिंबा देण्याची घोषणा केली. येथेच महाविकास आघाडीला ‘खो’ बसला. त्यानंतर राज्य पातळीवर वेगाने घडामोडी घडत गेल्या. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोणत्याही परिस्थितीत ‘गोकुळ’ काॅंग्रेसच्या ताब्यात राहिला पाहिजे, असे फर्मान पक्षाच्या नेत्यांना काढले.
संजय घाटगे यांची गोची
कोणत्याही परिस्थितीत ‘गोकुळ’मध्ये भाजपला जवळ करायचे नाही, असा आदेश ‘मातोश्री’वरून आहे. त्यानुसार माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांनी सत्तारूढ गटाची साथ सोडली. मात्र माजी आमदार संजय घाटगे हे त्यांच्यासोबतच राहिल्याने गोची होण्याची शक्यता आहे.