कोल्हापूर : पुण्यातील अंतर्गत राजकारणावरून बोलला असाल, पण चंद्रकांतदादा, आता जे सुचले ते २०१९ ला सुचायला हवे होते, आता वेळ निघून गेली आहे, त्यामुळे कोल्हापुरातून निवडणूक लढण्याचे वक्तव्य आता करणे चुकीचे आहे, शब्दांत पालकमंत्री सतेज पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांचा चिमटा काढला.कोल्हापुरातून निवडून आलो नाही तर हिमालयात निघून जाईन, असे वक्तव्य सोमवारी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केले होते. त्याबद्दल बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापुरात १० पैकी आठ आमदार महाविकास आघाडीचे आहेत.
दोनच अपक्ष आहेत, त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना निवडणूक लढवायची म्हटल्यावर त्यांच्यासाठी कोण राजीनामा देऊन जागा रिकामी करून देणार हा प्रश्नच आहे. त्यांना मानणाऱ्या अपक्षांनी जागा मोकळी करून द्यावी, असे आम्ही म्हणणार नाही, हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. आम्ही बोलणे योग्य होणार नाही.चंद्रकांत पाटील यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक पुण्यातील कोथरूडमधून लढविली. त्यांना जिंकायचा एवढा विश्वास होता तर त्याचवेळी त्यांनी निर्णय घेऊन कोल्हापुरातून निवडणूक लढवायला हवी होती. आता विधानसभेची निवडणूक नाही, त्यामुळे कोणी कुठून निवडणूक लढवावी याबद्दल चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. पुण्यातील पक्षांतर्गत राजकारण आणि तेथील समीकरणांतून स्वत:ची ताकद दाखविण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केले असावे असे वाटते, असेही पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.