कोल्हापूर : भारतीय आयुर्वेद ही उपचाराची सर्वोेत्तम पद्धती आहे.भावी पिढी सुदृढ असणे ही काळाची गरज आहे त्यामुळे विश्ववती आयुर्वेद चिकित्सालयमध्ये तयार करण्यात आलेली मोदामृत ही कुपोषणावरील उपचार पद्धती एक लाख मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिली.विश्वपंढरी येथे विश्ववती आयुर्वेद चिकित्सालय व संशोधन केंद्राच्या उदघाटन प्रसंगी ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे होते. यावेळी आमदार सतेज पाटील, सुजित मिणचेकर, आनंदनाथ महाराज, रामराया सांगवडेकर, वैद्य समीर जमदग्नी, कैलास काटकर उपस्थित होते.
विश्वपंढरी येथे बुधवारी विश्ववती आयुर्वेद चिकित्सालय व संशोधन केंद्राचे उदघाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी कैलास काटकर, आमदार सतेज पाटील, आनंदनाथ महाराज, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माणिक पाटील चुयेकर, आमदार सुजित मिणचेकर आदी उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)मंत्री पाटील म्हणाले, लोक राजकारण्यांपेक्षा महाराजांचे म्हणणे ऐकतात त्यामुळे आयुर्वेदाचा उपयोग गरीब रुग्णांसाठी करणारे मठ आणि संस्थांना मजबूत केले पाहीजे. बालपणातच मुलांचे व्यवस्थित पोषण होणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्राने संशोधनातून तयार केलेल्या मोदामृतचा प्रयोग आपण शहरातील २५ झोपडपट्टयांमधील ५०० मुलांवर करू. त्याचा चांगला परिणाम दिसला तर जूननंतर १ लाख मुलांपर्यंत ते पोहोचवले जाईल.आमदार सतेज पाटील म्हणाले,आजाराचे योग्य निदान आणि उपचार ही माणसाची गरज आहे. जिथे सगळे उपचार संपतात तिथे आयुर्वेदाचा दरवाजा उघडतो. महाराष्ट्रातील नंदुरबार सारख्या कुपोषणग्रस्त भागांमधील मुलांना मोदामृतसारखी उपचार पद्धती देता येईल का याचा विचार व्हावा. आमदार सुजित मिणचेकर यांनीही आयुर्वेद चिकित्सापद्धतीचा शासनाने प्रचार व प्रसार करावा असे आवाहन केले.यावेळी आनंदनाथ महाराज, वैद्य समीर जमदग्नी, कैलास काटकर यांनी मनोगत व्यक्त केले. राहूल शेलार यांनी प्रास्ताविक केले. प्रसाद पानकर यांनी केंद्रात होत असलेल्या संशोधनाची माहिती दिली. परेश देशमुख यांनी सुत्रसंचलन केले.
राजकारणात ठरवून अपघातयावेळी आमदार सतेज पाटील यांनी आम्हा राजकारणी मंडळींना अनेक ताणतणाव आणि धकाधकीला सामोरे जावे लागते त्यामुळे आमच्यासाठी काही उपचार पद्धती सांगा असे सांगितले, हा धागा पकडत मंत्री पाटील म्हणाले, राजकारणात ठरवून अपघात केले जातात. राजकीय मंडळींना सकारात्मक विचारांचे इंजेक्शन द्या. आचारसंहितेच्या ४५ दिवसात एकमेकांवर वाट्टेल ते आरोप कररूया, पण निवडणूक संपली की सगळं विसरून एकमेकांना मदत केले पाहीजे असे इंजेक्शन आणि सॉफ्टवेअर तयार करा. त्यांच्या या वाक्यावर एकच हशा पिकला.