दत्ता पाटील म्हाकवे : मुळक्षेत्र मेतके (ता.कागल) या सदगुरु बाळूमामा यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या गावात हालसिध्दनाथ-बाळूमामा भंडारा उत्सवाला भाविकांची मांदियाळी झाली आहे. हा पालखी सबिना याची देही याची डोळा पाहण्यासाठी गेल्या सात दिवसापासून सुरू असणाऱ्या या भंडारा उत्सवासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा सीमाभागातून दीड लाखाहून अधिक भाविक दाखल झाले होते. सदगुरु बाळूमामांच्या नावानं चांगभलं....श्री हालसिध्दनाथ महाराज की जय...असा अखंड नामघोष ढोल,कैताळाचा निनाद,पालखी सोहळा पाहून हजारो भाविक आत्मतृप्त झाले. भंडाऱ्याच्या उधळणीत भाविक नाहून गेले होते. मंदिर परिसर पिवळा जर्द झाला होता. माघ पौर्णिमेला या भंडारा उत्सवाला बाळूमामांनी परिसरातील चाळीस गावातील नागरिकांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. तोच भंडारा आजही भाविक श्रद्धापुर्वक अमाप उत्साहात साजरा करतात. काकड आरती,प्रवचन, किर्तन, ज्ञानेश्वरी पारायण, भजन व वालंग (ढोल वादन) यामुळे सात दिवसापासून या पवित्र चिकोत्रा नदीतीरावर भावभक्तीचा मेळाच जमला होता. शुक्रवारी सायंकाळी नाथांचे भक्त भगवान डोणे-वाघापुरे यांचे आगमन झाले. गावच्या मुख्य चौकात बिरदेव व बाळूमामा यांच्या पालखीच्या गाठीभेटी झाल्या. तसेच, मिरज, बेडग, टाकळी, मालगांव, उदगाव, शिरोळ, उमळवाड, टोप, पेठवडगाव, घुणकी, म्हाकवे, कुर्ली, हमिदवाडा, मिणचे,सावर्डे, कारदगा आदी गावातील वालंगे समाजही दाखल झाला होता.यावेळी पालखी पुजन व देवाचा सभिना, तसेच धनगरी ढोलाचा वालंग व हेडाम खेळण्यात आले. तसेच, सकाळी ज्ञानेश्वरी पारायणची सांगता झाली. तर, महानैवेद्य होवून सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप झाले. सायंकाळी दिंडी सोहळा होवून भंडारा उत्सवाची सांगता झाली. रात्री उशिरापर्यंत भाविक परतत होते.तरुण मंडळासह ग्रामस्थानचे योगदान.. या भंडारा उत्सवाला भावभक्तीची किनार असल्याने मोठी गर्दी होते. सीमाभागातून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये. यासाठी सद्गुरू बाळूमामा चँरिटेबल ट्रस्टने नेटके नियोजन केले. तर सर्व भाविकांना महाप्रसादाचा व्यवस्थित लाभ घेता यावा यासाठी तरुण मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने परिश्रम घेतले.
बाळूमामांच्या नावानं चांगभलं.., मेतकेत भंडारा सोहळ्यात भाविकांची मांदियाळी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2023 5:48 PM