शिरगाव : शिरगाव (ता राधानगरी) येथे मंजूर नवीन ग्राम सचिवालयाच्या बांधकामाची जागा बदलून, सर्व सोयींनी युक्त अशा ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर नवीन ग्रामसचिवालयाचे बांधकाम करावे, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने श्री ज्योतिर्लिंग देवालय जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष शंकर कलिकते, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुकुमार शिरगावकर, प्रशांत पाटील, आर. एम. पाटील, बाजीराव पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे .
निवेदनाच्या प्रती ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर; पंचायत समिती, गटविकास अधिकारी, राधानगरी, तहसीलदार राधानगरी यांना पाठविल्या आहेत.
दरम्यान, याबाबत मौजे शिरगाव (ता. राधानगरी) येथे विविध शासकीय योजनांतून चालू असलेले ग्रामपंचायतीचे ऑफिस बांधकाम अन्यत्र न हलवण्याबाबत राधानगरीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे, असे येथील सरपंच रूपाली राजेंद्र व्हरकट, उपसरपंच शरद कांबळे व सत्ताधारी आघाडीतील सदस्यांनी सांगितले. विकासकामामध्ये अडथळा आणण्याचे व शासनाची फसवणूक करण्याचे काम काहीजण सतत करीत असतात. तसेच सदर व्यक्तीने केलेल्या अर्जामध्ये ज्या लोकांच्या सह्या आहेत त्यांना चुकीची माहिती देऊन व दिशाभूल करून सह्या घेतलेल्या आहेत व काही सह्या या बोगस आहेत. या अर्जाचा कोणत्याही बाजूने विचार करू नये असे सरपंच व्हरकट, उपसरपंच कांबळे व सत्ताधारी सदस्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.