कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) असलेले खाट व गाद्या सहा महिन्याला बदला अशा सूचना राज्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिणगारे यांनी शनिवारी दिल्या. राज्यातील प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाला मूलभूत सोयीसुविधा आणि निधीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिष्ठाता यांची ‘समन्वय समिती’ स्थापण्याचा निर्णय घेतला असल्याचेही शिणगारे यांनी सांगितले. आठवड्यापूर्वी शिवसेनेने येथील ‘सीपीआर’ प्रश्नांसंदर्भात शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठातांना धारेवर धरले होते. त्यावेळी झालेल्या चर्चेनुसार शिणगारे हे शनिवारी कोल्हापुरात आले होते. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. रघुजी थोरात उपस्थित होते. शिवसेनेच्या शिष्टमंडळाबरोबर सकाळी शिणगारे यांची अधिष्ठाता कार्यालयात बैठक झाली. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा शुभांगी साळोखे, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, कमलाकर जगदाळे यांनी रुग्णालयाचे प्रलंबित प्रश्न उपस्थित केला. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर शिणगारे यांनी ‘सीपीआर’मधील मूलभूत सुविधांची पाहणी केली. शिणगारे म्हणाले, सीपीआरला लवकरच दीड कोटी रुपयांची औषधे देणार आहे. रुग्णालयातील प्रत्येक खाट (बेड) व गाद्या सहा महिन्याला बदलाव्या, ‘सीपीआर’ परिसरातील अतिक्रमण हटविण्यासाठी सूचना दिल्या. रुग्णालयात पोलिसांना बसण्यासाठी वाढीव जागा द्या. शिष्टमंडळात शशी बिडकर, दत्ता टिपुगडे, रवी चौगुले, रणजित आयरेकर, आदींचा सहभाग होता.
सहा महिन्याला खाट, गाद्या बदला
By admin | Published: April 26, 2015 12:56 AM