काँग्रेसची ३१ आॅगस्टपासून ‘परिवर्तन’ यात्रा, कोल्हापुरातून रणशिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 05:45 PM2018-08-18T17:45:47+5:302018-08-18T17:49:33+5:30
केंद्र व राज्यातील सत्तारुढ भाजप सरकारच्या विरोधात काँग्रेस पुन्हा राज्यभर रान उठविणार आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने येत्या ३१ आॅगस्टपासून पश्चिम महाराष्ट्रात ‘परिवर्तन यात्रा’ सुरू होत आहे. त्याची सुरुवात कोल्हापुरातून होत आहे.
कोल्हापूर : केंद्र व राज्यातील सत्तारुढ भाजप सरकारच्या विरोधात काँग्रेस पुन्हा राज्यभर रान उठविणार आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने येत्या ३१ आॅगस्टपासून पश्चिम महाराष्ट्रात ‘परिवर्तन यात्रा’ सुरू होत आहे. त्याची सुरुवात कोल्हापुरातून होत आहे.
या यात्रेच्या नियोजनासाठी पुण्यात काँग्रेस समिती कार्यालयात सोमवारी (दि. २०) दिवसभर आमदार, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व प्रमुख नेत्यांची बैठक होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील यात्रेचे आमदार सतेज पाटील हे समन्वयक आहेत.
काँग्रेसने यापूर्वी माणिक ठाकरे हे प्रदेशाध्यक्ष असताना ‘जनजागरण’ यात्रा काढली होती. त्यानंतर गेल्या वर्षी दोन्ही काँग्रेसच्यावतीने ‘संघर्ष’ यात्रा काढण्यात आली. आता काँग्रेसने ही ‘परिवर्तन’ यात्रा काढण्याचे नियोजन केले आहे. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस हा सक्षम पर्याय आहे व लोकांनी परिवर्तन करावे, असा जनतेला विश्वास देण्यासाठीच ही यात्रा काढण्यात येणार आहे.
कोल्हापुरातून ३१ आॅगस्टला सुरू होणारी ही यात्रा सांगली, कऱ्हाड , सातारा, सोलापूर करून पुण्यात सांगता होईल. ही यात्रा नऊ दिवसांची असून, रोज किमान २२ किलोमीटर जाणार आहे. प्रत्येक दिवशी तीन जाहीर सभांचे नियोजन आहे.
ती प्रत्येक विधानसभा मतदार संघातून जावी, असे नियोजन करण्यात येत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील यात्रा झाल्यावर गणेशोत्सव झाल्यावर पुन्हा उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात ही यात्रा काढण्याचे पक्षाचे नियोजन आहे.
केंद्र व राज्यातील सत्तारुढ भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांचा पाढा या यात्रेत वाचला जाणार आहे. मराठा, धनगर, लिंगायत समाजाची आरक्षणाची मागणी, फसलेली कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मुंबईतील शिवाजी महाराजांचे स्मारक, वाढती महागाई, यांसह सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर सरकारवर आसूड ओढला जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. गेल्या चार वर्षांत विविध निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाने खचलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनांत विजयाचा विश्वास निर्माण करण्याचा पक्षाकडून प्रयत्न आहे. लोक त्यांना कसा प्रतिसाद देतात यावर नेत्यांचे व त्या पक्षाचेही भवितव्य ठरणार आहे.