समाज को बदल डालो! या नावाचे दोन हिंदी चित्रपट येऊन गेले आहेत. समाजातील अनिष्ट चालीरीती आणि कुप्रथांवर भाष्य करीत समाजात बदल करणे किंवा काळानुरुप बदल स्वीकारणे कसे गरजेचे आहे यावर हे चित्रपट भाष्य करतात. यातील पहिला चित्रपट १९४७ चा, तर दुसरा १९७० सालातला आहे. आजही समाजातील अनिष्ट चालीरीती आणि कुप्रथा पूर्णपणे नाहीशा झालेल्या नाहीत. अनेक जाती-जमाती परंपरेच्या आणि आम्हीच श्रेष्ठ अशा वृथा विचारांच्या जोखडात अडकून पडल्या आहेत. भारतात विविध जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. हा जगभरातील इतर देशांसाठी कौतुकाचा विषय आहे. आपली धर्मनिरपेक्षता हाही अभिमानाचा विषय आहे. अठरापगड जातींचा आपला समाज. या समाजातील प्रत्येक जातीधर्माचे सण, समारंभ, त्यांच्या चालीरीती, प्रथा-परंपरा वेगळ्या आहेत. प्राचीन काळापासून चालत आलेल्या या प्रथा-परंपरांचे पालन केले जात असले तरी त्यातील काही अनिष्टही आहेत. देवदासीसारख्या प्रथेचा त्यामध्ये समावेश होतो. ती नाहीशी करण्यासाठीची मोहीम सुरू होऊन अनेक वर्षे उलटली तरी आजही ग्रामीणच काय शहरी भागातही ही प्रथा चालू असल्याचे दिसते. सध्याचे युग हे कलियुग आहे असे म्हटले जाते. त्यामुळेच समाजात सत्याचा अंश कमी आणि असत्याचा जादा आहे, असा काही लोकांचा समज आहे. तरीही समाजात जो चांगुलपणा टिकून आहे तो अशा सत्यवचनी आणि प्रामाणिक लोकांमुळेच असेही म्हटले जाते. भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीत प्रामाणिक लोकांना टिकू दिले जात नाही, हेही तितकेच खरे. तरीही हे लोक सत्याची कास सोडत नाहीत. आपल्या समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न ते करीत असतात. समाजातील सर्वच जाती-जमाती किंवा धर्माचे लोक आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या एकाच स्तरावर नाहीत. यातील सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या जाती-जमातींच्या उथ्थानासाठी भारत सरकारने आरक्षणासह विविध सोयी, सवलतींची तरतूद केलेली आहे. त्याचा लाभ या जाती-धर्मातील अनेकांना झाला आहे. त्यांचा सामाजिक, आर्थिक स्तर सुधारला आहे; पण याचे प्रमाण आजही कमीच आहे. सरकारकडून दिल्या जाणाºया या सोयी, सवलती प्रगत समजल्या जाणाºया जातींना मिळत नाहीत. यात महाराष्ट्रात बहुसंख्याक असलेल्या मराठा समाजाचाही समावेश आहे. बहुसंख्य मराठी बांधवांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. तो बेभरवशाचा आहे. यामुळे या शेतकºयांचा आर्थिकस्तर खालावलेलाच राहतो आहे. नोकºया मिळत नाहीत. महागडे शिक्षण घेण्याची ऐपत नाही, यासारख्या विविध कारणांनी या समाजाची प्रगती खुंटली आहे की काय असे म्हणण्यासारखी परिस्थिती झाल्यानेच हा समाज गेल्या वर्षभरापासून आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मूकमोर्चे काढतो आहे. निशब्द हुुंकार देत राज्य सरकारला धक्के देत आहे. मुंबईत ५८वा मराठा क्रांती मोर्चा बुधवारी झाला. लाखो मराठा बांधवांनी त्याला हजेरी लावून आपली ताकद दाखवून दिली. मागण्या मान्य न झाल्यास यापुढे निशब्द राहणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. सरकारने मराठा समाजाच्या काही मागण्या मान्य केल्याची घोषणा केली आहे. सर्व मागण्या मान्य झाल्यास या समाजातील तरुणांनाही संधी उपलब्ध होतील. तरीही स्पर्धेच्या या युगात टिकण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. जसे हे आंदोलन झाले तसेच आंदोलन भ्रष्टाचार आणि अनितीविरुद्धही झाले तर समाज सुधारण्यास आणि सर्वांनाच योग्यतेप्रमाणे संधी मिळण्यासाठी ते उपयुक्त ठरेल. केवळ नेत्यांनी घोषणा करून काही होणार नाही. ‘स्वच्छ भारत अभियान’चे काय होतंय ते दिसतेच आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:पासून याची सुरुवात केली तर जसे मराठा क्रांती मोर्चे यशस्वी झाले तसे ‘भ्रष्टाचारी समाज को बदल डालो’ आंदोलनही यशस्वी होईल- चंद्रकांत कित्तुरे
समाज को बदल डालो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 12:28 AM