लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्हा परिषदेतील चार विभागांच्या ‘वर्ग-३’ व ‘४’च्या १२० कर्मचाऱ्यांच्या शुक्रवारी बदल्या करण्यात आल्या. बदल्यांच्या प्रक्रियेमुळे तिसऱ्या मजल्यावर कर्मचाऱ्यांची झुंबड उडाली होती. आज, शनिवारीही ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बदल्या न्यायालयाच्या स्थगितीमुळे करण्यात आल्या नाहीत. ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार १५ मेपर्यंत या बदल्या करणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार समिती सभागृहामध्ये या प्रक्रियेबाबतची तयारी करण्यात आली होती. विशेष म्हणजे अध्यक्षा शौमिका महाडिक आणि उपाध्यक्ष सर्जेराव पाटील कळेकर हे दिवसभर या प्रक्रियेमध्ये सहभागी झाले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस. घुले, जिल्हा कृषि अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार बुरूड यावेळी उपस्थित होते. प्रशासन विभागाच्या १५ प्रशासकीय व ४० विनंती व आपसी बदल्या झाल्या आहेत. ग्रामपंचायत विभागाच्या ४ प्रशासकीय व ४९ विनंती व आपसी बदल्या झाल्या आहेत. वित्त विभागाच्या ५ तर कृषि विभागाची एकही बदली झालेली नाही. बांधकाम विभागाच्या एकूण ७ बदल्या झाल्या आहेत. अशा एकूण १२० बदल्या झाल्या आहेत. सभागृहात संबंधित कर्मचाऱ्यांना बोलावल्यानंतर त्यांना स्क्रीनवर रिक्त जागा दाखविण्यात येत होत्या. त्यांना कुठले गाव अपेक्षित आहे याबाबत विचारणा होत होती. यानंतर संबंधितांच्या विनंतीनुसार बदलीचे ठिकाण निश्चित करण्यात येत होते. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ शूटिंग करण्यात आले आहे. प्रशासन आणि ग्रामपंचायत विभागाच्या बदल्या असल्याने तिसऱ्या मजल्यावर मोठी गर्दी झाली होती. जिल्ह्यातून इच्छुक ग्रामसेवक व वरिष्ठ, कनिष्ठ सहाय्यकांनी गर्दी केली होती. सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही प्रक्रिया सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालली.यांना बदल्यातून मिळते सूटप्रत्यक्षात त्या-त्या विभागांना काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असली तरीही ९ प्रकारच्या निकषांमध्ये बसत असलेल्या कर्मचाऱ्यांना बदल्यांतून सूट आहे. त्यामुळे प्रत्यक्षात बदल्या कमी होतात. पक्षघात, हृदयशस्त्रक्रिया, मूत्रपिंड विकार, अपंग, ५३ वर्षांवरील कर्मचारी, मतिमंद मुलांचे पालक, विधवा, परितक्त्या, घटस्फोटित, कुमारिका, कॅन्सरग्रस्त आणि आजी-माजी सैनिकांना या बदली प्रक्रियेतून वगळण्यात येते.
जिल्हा परिषदेत बदल्यांची झुंबड
By admin | Published: May 13, 2017 12:14 AM