निंगाप्पा बोकडेचंदगड : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात एक अजब प्रकार घडला असून गावाचे नाव बदलण्यासाठी अर्ज केले असताना चक्क तालुक्याचे नाव बदलले गेले. एनआयसीकडून ही मोठी चूक घडल्यामुळे गेले काही दिवस तहसील कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते. सोमवारी उशिरा मात्र हे दुरुस्त झाल्याने लोकांना दिलासा मिळाला आहे. चंदगड तालुक्यातील डुक्करवाडी गावाचे नाव गेल्या महिन्यात बदलण्यात आले. त्यावेळी गावाबरोबरच एनआयसीने तालुका ही तहसील ही रामपूर केल्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. त्यामुळे आँनलाईन कामकाज ठप्प झाले होते. चंदगड तालुक्याचे नावच रामपूर केल्याने आँनलाईन दाखला काढण्यास गेल्यानंतर ही बाब ही उघडकीस आले. डुक्करवाडी गावचे नाव रामपूर करण्यासाठी एनआयसीकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. पण एनआयसीने केवळ रामपूर गावाऐवजी संपूर्ण तालुकाच रामपूर केल्यामुळे हा अजब प्रकार घडल्याचे समजते. तालुक्यातील एका नागरिकाने उत्पन्न दाखला काढल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर प्रशासन सर्व कामकाज थांबवत तहसीलदार राजेश चव्हाण यांनी पुढाकार घेऊन एनआयसीला ही निदर्शनास आणून दिली. त्यामुळे सोमवारी सायंकाळी ही दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे तालुक्यातील नागरिकाना दिलासा मिळाला आहे. पण शासनाच्या या अजब प्रकारामुळे अनेकांना याचा फटका बसल्याने याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
Kolhapur: चंदगड तालुक्याचे नाव बदलले, तांत्रिक घोळाने कामकाज खोळंबले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 7:13 PM