कोल्हापूर : काही एस. टी. मित्र युवकांनी एकत्र येऊन सुरूकेलेल्या ‘एस. टी. च्या इतिहासाचा प्रवास एकाच छताखाली’ तेही एस.टी. बसमध्ये पाहण्यास मिळावा, या उद्देशाने अनोखे असे ‘वारी लालपरीचे’ प्रदर्शन भरविण्यात आले आहे. मध्यवर्ती बसस्थानक येथे सोमवारी सकाळी प्रवासी दत्तात्रय खोडके, मंगला खोडके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर हे प्रदर्शन पाहण्यासाठी प्रवासी, नागरिक यांच्यासह एस.टी. कामगारांनी दिवसभर मोठी गर्दी केली होती.
महाराष्ट्रातील प्रमुख बसस्थानकांवरील एस.टी. प्रेमी संघटना आणि महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ यांच्यातर्फे ‘एस. टी. विश्व’ हे फिरते प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात १९४८ पासून अर्थात एस.टी.च्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या विविध स्थित्यंतरांचे दर्शन प्रवाशांना होणार आहे. एस. टी. बसची विविध मॉडेल्स, एस. टी.चा इतिहास, विविध योजनांची माहिती, प्रवाशांचे रंजक अनुभव अशा अनेक गोष्टी या प्रदर्शनात फोटो व वस्तंूच्या माध्यमातून मांडण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन पाहण्यासाठी विनामूल्य खुले आहे. याप्रसंगी ज्युनिअर आगार व्यवस्थापक दयानंद पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी शिवराज जाधव, कामगार अधिकारी मनीषा पवार यांच्यासह अधिकारी, कामगार व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.येथे सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत प्रदर्शन पाहण्याची संधी...गडहिंग्लज : २५ जूनइचलकरंजी : २६ जूनसांगली : २१ जून
लोकवाहिनी असलेल्या एस.टी.ने मागील काही वर्षांत स्वत:मध्ये आमूलाग्र बदल केले आहेत. एक नवीन रूप एस.टी.ने परिधान केले आहे. आजच्या युगाच्या आधुनिक लालपरीचा इतिहास या प्रदर्शनातून पाहण्यास मिळतो. प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले असून, यांचा लाभ प्रवाशांनी घ्यावा.- अजय पाटील, आगार व्यवस्थापक, कोल्हापूर.