कोल्हापूर : शहराच्या तिसऱ्या विकास आराखड्याच्या टेंडरमध्ये कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचार, घोळ अथवा गैरप्रकार करण्याचा प्रश्न येत नसल्याचे स्पष्टीकरण महापौर निलोफर आजरेकर यांनी पत्रकाद्वारे केले आहे. तीन वर्षांपासून रखडलेला आराखडा गतीने होण्यासाठी अटी व शर्ती शिथिल केल्या.
या संदर्भात अंतिम निर्णय आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी घेणार आहेत. त्यामुळे भाजप-ताराराणी आघाडीच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. टीका करण्यासाठी कोणताच मुद्दा नसल्यामुळे या माध्यमातून आरोप करून दिशाभूल करण्याचा उद्योग त्यांच्याकडून सुरू असल्याचे त्यांनी यामध्ये म्हटले आहे.महापौर आजरेकर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शहराचा तिसरा सुधारित विकास आराखडा तयार करण्यासाठीची निविदा प्रक्रिया गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. महानगरपालिकेच्या स्थापनेपासून विविध कारणांनी शहराची एक इंचही वाढ होऊ शकलेली नाही; परंतु शहरीकरणामध्ये व लोकसंख्येत भरमसाट वाढ झालेली आहे.
या विकास आराखड्यामध्ये शहराची येत्या ३० वर्षांमध्ये होणारी वाढ लक्षात घेऊन जागांसंदर्भात नियोजन करण्यात येणार आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर भविष्यात उद्भवणाऱ्या अशा प्रकारच्या विविध आपत्तींचाही हा आराखडा तयार करताना विचार करणे गरजेचे आहे.
या सभागृहाची मुदत येत्या दोन महिन्यांमध्ये संपणार आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर मार्गी लागावे. हे काम कोणा एका विशिष्ट संस्थेलाच न मिळता या निविदेमध्ये निकोप स्पर्धा व्हावी, यासाठी प्रशासनाला पत्र देऊन निविदेत सुधारणा करण्याबाबत कळविले होते.यानुसार केलेल्या सुधारणेमुळे टेंडरला जास्त प्रतिसाद मिळाला. यामुळे निविदा प्रक्रियेमध्ये इतर पात्र संस्थांचा सहभाग झाल्याने कोणाच्या संबंधातील एखाद्या संस्थेला टेंडर मिळाले नाही. त्यामुळे याबद्दल आरोप करणे ही बाब चुकीची आहे.भाजप सत्तेवर असताना कोणती कामे केली?महापालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना आघाडीच्या माध्यमातून कोल्हापूर शहराच्या विकासाचे प्रश्न सुटत असल्याने तसेच विरोधाचे कोणतेही मुद्दे मिळत नसल्यामुळेच विरोधकांकडून कुरघोड्यांचे राजकारण सुरू आहे. आमच्यावर आरोप करताना विरोधकांनी राज्यात भाजप आघाडीचे सरकार सत्तेवर असताना कोल्हापूर शहराच्या विकासाची कोणती ठोस कामे केली, याची माहितीही प्रसिद्ध करावी.जनतेच्या हिताची इतकी काळजी असेल तर त्यांनी कोरोना योद्धा म्हणून काम करण्यासाठी आपला वेळ सत्कारणी लावावा. महापालिकेची आगामी निवडणूक समोर दिसू लागल्यानेच विरोधकांकडून बिनबुडाचे व चुकीचे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे आजरेकर यांनी म्हटले आहे.