लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे - भुये व भुयेवाडी दरम्यान रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी मंत्री, खासदार, आमदार व शेतकऱ्यांच्या सर्व संमतीने मंजूर करण्यात आलेले रेखांकन डावलून नवीन रेखांकनाने दोन महामार्गांचे रस्ते केले जाणार असतील तर तो अन्याय आहे. यासाठी भूसंपादनाला कोणी आले तर त्याला रस्त्यावर उतरून विरोध करणार असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
रत्नागिरी नागपूर १६६ राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. करवीर तालुक्यातील केर्ली ते शिये दरम्यानच्या १४ किमी भूसंपादन प्रक्रियेत माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी लोकांच्या शेती व स्थावर मालमत्तेचे कमीत कमी नुकसान व्हावे, यासाठी ३० जानेवारी २०१८ व १२ एप्रिल २०१८ या दिवशी मंत्रालयात झालेल्या बैठकीत प्रस्ताव सादर केला. यावेळी माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संभाजीराजे, राजू शेट्टी, चंद्रदीप नरके, अमल महाडिक, सत्यजीत पाटील व राज्य व राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी, शेतकरी प्रतिनिधी हजर होते. भुये व भुयेवाडी दरम्यान राज्य मार्ग १९४ चे २०० फुटाने रुंदीकरण करून राष्ट्रीय महामार्ग १६६ चे रेखांकन मंजूर करण्यात आले.
यात शेतकरी व ग्रामस्थांचे कमीत कमी नुकसान होत असताना पुन्हा भुये भुयेवाडी बायपास करण्याचा घाट सुरू झाला आहे.
प्रतिक्रिया
गेली दोन वर्षे याबाबत मंत्रालय पातळीवर चर्चा होऊन भुये ते भुयेवाडी दरम्यान राज्य मार्गाचे रुंदीकरण करून रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग करण्याचा प्लॅन मंजूर आहे. यामुळे शेती व स्थावर मालमत्तेचे नुकसान होणार नाही महामार्गाला आमचा विरोध नाही पण नवीन बायपास रस्त्याला आमचा विरोध आहे
--रमेश कांबळे सरपंच भुये
करवीर तालुक्यातील भुये व भुयेवाडी दरम्यान राज्य मार्गावरुनच रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाला मंत्रालयात मंजुरी मिळाली आहे. दोन रस्ते होणार असतील तर आमचा विरोध असेल
-- मा. आ. चंद्रदीप नरके
आमचा महामार्गाला विरोध नाही पण मंत्री, खासदार, आमदार,अधिकारी व शेतकऱ्यांच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेला प्लॅन पुन्हा बदलला जातो. शेतकरी ग्रामस्थांचे नुकसान करून कुणाच्या राजकीय हितासाठी प्लॅन बदलला याबाबत पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे अन्यथा रस्त्यावर उतरू
--- धन्वंती दादासाहेब पाटील -भुयेवाडी ग्रामस्थ
(फोटो)
करवीर तालुक्यातील भुयेवाडी दरम्यान दीड किलोमीटर अंतरासाठी दोन महामार्गचे रेखांकन होत असलेला नकाशा