कोल्हापूर : कोल्हापूरचा वादग्रस्त टोल, गांधीनगर येथील अतिक्रमण, थेट पाईपलाईनप्रश्नी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महापालिकेच्या धडाकेबाज आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांची कर्नाटक विभागीय स्टाफ सिलेक्शन कमिटीच्या प्रादेशिक संचालकपदी निवड झाली. २१ जानेवारीपर्यंत त्या नवीन पदचा कार्यभार स्वीकारणार आहेत. कोल्हापूरच्या जिव्हाळ्याची थेट पाईपलाईन, टोल, एलबीटी, पंचगंगा प्रदूषण आदी प्रश्नी महत्त्वाची भूमिका बजावली तसेच कारकिर्दीत एक हजार कोटींचा निधी मार्गी लावल्याचा विशेष आनंद असल्याची प्रतिक्रिया आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी या २०००-०१च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. संगणक अभियंता असलेल्या बिदरी यांनी पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळविले. महाराष्ट्रात महसूलसह स्थानिक स्वराज्य संस्थांत त्यांनी सेवा बजावली. कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदी त्या साडेतीन वर्षांपूर्वी रूजू झाल्या. दरम्यान, केंद्रीय सेवा तसेच प्रतिनियुक्तीवर बंगलोर येथील ‘इस्रो’ संस्थेत काम करण्यासाठी जून २०१४ मध्ये त्यांनी केंद्र सरकारकडे विनंती अर्ज केला होता. त्यांची केंद्र सरकारने कर्नाटक विभागीय स्टाफ सिलेक्शन समितीच्या संचालकपदी नेमणूक केली. कर्नाटक, केरळ व लक्षद्वीप या राज्यांत ‘वर्ग एक’ ची सर्व महत्त्वाची पदे भरण्याची जबादारी त्यांच्याकडे असेल. शासनाच्या सर्वच विभागांतील ही वरिष्ठ पदे भरताना आवश्यक त्या परीक्षा, मुलाखती व नेमणुका याची सर्व जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. देशभरात स्टाफ सिलेक्शन समितीचे आठ विभाग आहेत. यातील एका विभागाची त्या जबादारी सांभाळतील. गेल्या १५वर्षांच्या उच्च प्रशासकीय सेवेचा लाभ या ठिकाणी काम करताना होणार आहे. याबाबतचे राज्य शासनाला आदेश प्राप्त झाले आहेत, लवकर पुढील पाच वर्षांसाठी राज्याच्या सेवेतून बिदरी यांना पदमुक्त करण्याचे आदेश निघणार आहेत. पाच वर्षांनंतर त्या राज्याच्या सेवेत पुन्हा दाखल होणार असल्याचे आयुक्त बिदरी यांनी स्पष्ट केले.पंचगंगा प्रदूषण, टोल, एलबीटी, थेट पाईपलाईन, के.एम.टी.साठी १०४ बसेस खरेदी, कळंबा तलाव सुशोभीकरण, अंतर्गत ड्रेनेज लाईन व रस्ते रंकाळा यासारख्या कोल्हापूर शहरातील अत्यंत जिव्हाळ्याच्याप्रश्नी त्यांना ठाम व चोख भूमिका बजावता आली. त्यांनी थेट पाईपलाईनची निविदा अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविली. ‘एमजेपी’कडून पुनर्मूल्यांकन करून घेतले. त्यामुळेच महापालिकेची तब्बल ५० कोटींहून अधिकची रक्कम वाचली. त्याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिली. (प्रतिनिधी)पंचगंगा प्रदूषण, टोल, एलबीटी, थेट पाईपलाईन, के.एम.टी.साठी १०४ बसेस खरेदी, कळंबा तलाव सुशोभीकरण, अंतर्गत ड्रेनेज लाईन व रस्ते, रंकाळा यासारख्या शहरातील जिव्हाळ्याच्याप्रश्नी चोख भूमिका बजावता आली. शहरवासीयांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या टोलप्रश्नी शासन व न्यायालयात यापूर्वीच सक्षमपणे भूमिका मांडली आहे. टोलमुक्तीसाठी महिनाअखेरपर्यंत मूल्यांकन समिती कोल्हापुरात येईल. पदभार सोडण्यापूर्वी टोलमुक्तीसाठी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करू.- विजयालक्ष्मी बिदरी, आयुक्त
२१ जानेवारीला आयुक्त घेणार केंद्रीय सेवेचा ‘चार्ज’
By admin | Published: January 05, 2015 12:14 AM