कोल्हापूर : खासदार राजू शेट्टी यांनी अलीकडे राबणाऱ्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष, तर ‘चमको’ कार्यकर्त्याना सन्मान ही भूमिका ठेवल्याचे दिसून येत आहे. ज्यांना शिव्या द्यायच्या त्यांच्याच गळ्यात गळे घालून खासदारकी वाचविणे इतकाच त्यांचा अजेंडा बनला आहे.
बहुजन समाज आता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. त्यामुळे आम्ही अनेक कार्यकर्त्यांसह ‘स्वाभिमानी’तून बाहेर पडत असल्याची घोषणा भादोले येथील शिवाजीराव माने यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली.शेतकरी केंद्रबिंदू मानून ऊस, दूध, भाजीपाला, भात, नाचणी, कडधान्ये या व इतर पिकांना हमीभाव मिळावा, शेतीला माफक दरात वीज मिळावी यासाठी शेतकरी चळवळीचे नवे रोपटे लावत असून, घटस्थापनेदिवशी (दि. १०) दुपारी ४.३० वाजता कोल्हापुरात राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये मेळावा घेत असल्याचे माने यांनी जाहीर केले. मेळाव्यात चळवळीची घोषणा, ध्येयधोरणे, कार्यकारिणी व आंदोलनाची दिशा यांवर विचारमंथन होणार आहे.माने म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून रस्त्यांवर आंदोलने, मेळावे, खटले यांमध्ये आमचा सहभाग राहिला; पण खासदार शेट्टी हे कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून प्रस्थापितांना हाताशी धरून त्यांचे राजकारण करीत आहेत. त्याविरोधात पेठवडगाव येथे असंतोष मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला. त्यावेळी सुकाणू समिती स्थापन केली. त्यानंतर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांशी चर्चा करून आम्ही नवी चळवळ उभारण्याचा निर्धार केला आहे, असेही ते म्हणाले.या पत्रकार परिषदेस धनाजी पाटील, शिवाजी शिंदे, शामराव पाटील, सदाशिव कुलकर्णी, बंडा पाटील, भीमराव पाटील, गोरक्ष पाटील, बाळासाहेब भंडारी, उत्तम पाटील, संतोष शिंदे, राजेश पाटील, विष्णुपंत पाटील, आदी उपस्थित होते.
खा. शेट्टी यांच्याभोवती ठेकेदार लॉबी सक्रियविकासनिधी देताना गावागावांतील फाटक्या कार्यकर्त्यांचा विचार न करता त्यांचे ‘पी. ए.’च सर्व कामे ठरवीत असून, त्यामुळे ठेकेदार लॉबी सक्रिय झाली आहे. खा. शेट्टी यांच्याभोवती ठरावीक लोकांचे टोळकेच तयार झाले आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांना वालीच नसल्याचे चित्र तयार झाले. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी नव्हे, खासदारकी वाचविण्यासाठी काम करणारी संघटना अशी ‘स्वाभिमानी’ची ओळख होत आहे.
ज्यांना शिव्या, त्यांच्याच गळ्यात गळेकाँग्रेस-राष्ट्रवादीला शिव्याशाप देऊन खासदार राजू शेट्टी हे प्रस्थापित बनले; पण आता त्यांच्याच गळ्यात गळे घालून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे. २००९ ला ‘रिडालोस’चा प्रयोग, २०१४ भाजप-सेनेची मदत, २०१९ ला काँग्रेस-राष्ट्रवादीचा टेकू असा शेट्टींचा प्रवास आहे, आता तर आंबेडकरवादी संघटनांशी आणि ‘एमआयएम’शी नाते जोडण्याची त्यांची भाषा सुरू आहे, असेही ते म्हणाले.