कोल्हापूर : सात दिवसात दामदुप्पट आणि मोठ्या रकमेचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारी भामटी महिला रेश्मा बाबासो नदाफ (वय ४१, रा. तणंगे मळा, इचलकरंजी) हिच्यावर जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले.
आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून या गुन्ह्याचा तपास सुरू असून, चार दिवसात दुसरा संशयित शब्बीर बाबालाल मकानदार (वय ६२, रा. कागवाडे नाका, इचलकरंजी) याच्यावरही आरोपपत्र दाखल होणार असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी दिली.संशयित रेश्मा नदाफ हिच्यासह ११ जणांनी संगनमताने शेकडो लोकांना १४ कोटी ३५ लाख ८७ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. कमी कालावधित आणि कमी व्याज दरात मोठ्या रकमांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष या टोळीने लोकांना दाखवले. तसेच गुंतवलेली रक्कम अवघ्या सात दिवसात दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक केली.
जुलै २०२२ मध्ये राधानगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या टोळीचे बिंग फुटले. एकूण ११ पैकी रेश्मा नदाफ आणि शब्बीर मकानदार हे दोन संशयित अटकेत आहेत. त्यातील रेश्मा नदाफ हिच्यावर आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने शुक्रवारी (दि. १७) जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.