कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी आरोपी समीर गायकवाड याच्या विरोधात आज, सोमवारी होणाऱ्या सुनावणीमध्ये दोषारोप निश्चित करण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वीच्या सुनावणीस प्रशासकीय कामामुळे तपास अधिकारी डॉ. दिनेश बारी गैरहजर राहिले होते. त्यामुळे न्यायालयाने पुरवणी तपास अहवाल सादर करण्यासाठी वाढीव पंधरा दिवसांची वेळ द्यावी, अशी विनंती विशेष सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एल. डी. बिले यांना केली होती. न्यायाधीश बिले यांनी आणखी सहा दिवसांची वेळ देत, ४ एप्रिलला पुढील सुनावणी ठेवली. यावेळी तपास यंत्रणेचा अहवाल पाहून समीर गायकवाड याच्याविरोधात दोषारोपपत्र निश्चित करण्यात येणार असल्याचेही न्यायालयाने सांगितले. त्याचबरोबर या सुनावणीस समीर गायकवाड याला न्यायालयात हजर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. (प्रतिनिधी)
समीरवर आज आरोपपत्र शक्य
By admin | Published: April 04, 2016 1:02 AM