कोल्हापूर : रिझर्व्ह बॅँकेसह सभासदांची दिशाभूल करून बोगस ताळेबंद सादर करणाऱ्या प्राथमिक शिक्षक बॅँकेच्या संचालकांवर फौजदारी दाखल करणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. शिक्षक बॅँकेच्या २४० कोटींच्या ठेवी, जवळपास तेवढेच कर्जवाटप असताना केवळ १५ लाखच नफा कसा मिळतो? हा दाखविलेला नफाही बोगस असून, सभासद ठेव, कायम ठेव, वर्गणी ठेव, पेन्शनर्स ठेव या सर्व प्रकारच्या ठेवींवरील व्याजाची तरतूद अहवालात केलेली नाही. या ठेवीवर किमान पाच टक्के व्याजदर गृहीत धरला तर अडीच कोटींची तरतूद केलेली दिसत नाही. मागील दोन वर्षांतही अनेक तरतुदी न केल्यानेच त्याचा परिणाम सध्याच्या ताळेबंदावर दिसत असल्याचे राजेंद्र पाटील यांनी सांगितले. संचालकांच्या कारभाराची चौकशी अनेकदा झाली; सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी अहवाल देऊनही कारवाई होत नाही. रिझर्व्ह बॅँकेने तीन वेळा दंड केल्याने संचालकांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, जिल्हा उपनिबंधकांनी संचालक मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी रवळू पाटील यांनी केली. विरोधी पाच संचालकांनी अंकुश ठेवल्याने सत्ताधारी नियंत्रणात आल्याचे सांगत आतापर्यंत सत्ताधाऱ्यांनीच सभेत गोंधळ करून शिक्षकांना बदनाम केले. सभेत शिक्षक समितीचा कार्यकर्ता कधीच गोंधळ करीत नाही आणि करणारही नाही. (प्रतिनिधी)
बोगस ताळेबंद प्रकरणी संचालकांवर फौजदारी करणार
By admin | Published: July 31, 2016 12:26 AM