मुरगूड : मुरगूडमध्ये नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आज किरण पुंडलिक मडिलगेकर या व्यापाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला. पालिका मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी याबाबत स्वतः फिर्याद दिली.
कोरोना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांचे सूचनेनुसार तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम तरतुदीनुसार मुरगूड शहरामध्ये विविध नियम तयार केले आहेत. त्यामध्ये भाजी व फळ विक्रेत्यांना कन्या विद्यामंदिर याठिकाणी मोकळे पटांगणामध्ये सामाईक अंतर ठेवून बसवले आहे तसेच अँटिजेन टेस्ट (निगेटिव्ह रिपोर्ट) स्वतः व लसीकरण घेतलेले प्रमाणपत्र घेऊन या व्यापाऱ्यांना फळ व भाजी विक्री करणेसाठी अटी व शर्तीचे पालन करून नगरपरिषदेकडून ‘ना हरकत दाखला’ देण्यात आलेला आहे. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार किरण पुंडलिक मडिलगेकर हे खासगी जागेमध्ये भाजी विक्री व्यवसाय करत होते. याबाबत भाजी व फळ विक्रेते यांच्याकडून वारंवार नगरपरिषदेकडे तक्रारी येत होत्या. त्यानुसार मडिलगेकर यांना कन्या विद्यामंदिर पटांगण येथे भाजी विक्री करण्यासाठी तोंडी सूचना देण्यात आली होती पण मडिलगेकर बाजारपेठेतच व्यवसाय करत होता. त्यामुळे साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीनुसार मुख्याधिकारी, गाकवाड यांनी मुरगूड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.या मोहिमेमध्ये मुख्याधिकारी संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक विकास बडवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर कुमार खाडे, नगरपरिषद अधिकारी प्रकाश पोतदार, जयवंत गोधडे, रमेश मुन्ने यांनी सहभाग घेतला.