संदीप बावचे -- जयसिंगपूर नगरपरिषदेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे़ सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीने शहरात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे़ भाजपने मेळावा घेऊन स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे, तर शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडी सर्वच विरोधकांना घेऊन मोट बांधत आहे. त्यातच जयसिंगपूर-वाडी रस्त्यावरून सत्ताधारी व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवाद रंगल्याने शहरातील राजकीय वातावरण आत्तापासूनच तापू लागल्यामुळे २०१६ ची निवडणूक चांगलीच गाजणार आहे़ सांस्कृतिक आणि शिक्षणाची पंढरी म्हणून जयसिंगपूर शहराची ओळख आहे़ शासनाच्या योजना प्रभावीपणे शहरात राबविल्या जातात़ पालिकेचे शताब्दी वर्ष असल्यामुळे सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीने येणाऱ्या वर्षभरात शहरात शंभर कोटी रुपयांची विकासकामे राबविण्याचा संकल्प केला आहे़ वातानुकूलित नाट्यगृह, २४ तास पाणी, भुयारी गटार यासह अनेक योजना राबविण्याचे उद्दिष्ट सत्ताधाऱ्यांनी हाती घेतले आहे़ गतवेळी शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजप व मित्र पक्षाने लढा दिला़ मात्र, त्यांची झुंज अपयशी ठरली़ गेल्या पाच वर्षांत विरोधी नगरसेवक नसल्याने पालिकेत एकहाती सत्तेतून विकासकामे सुरू आहेत़ विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यात राजकीय समीकरणे बदलली आहेत़ याचाच परिणाम येत्या जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत दिसणार आहे़ आमदार सुरेश हाळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच शिरोळ, जयसिंगपूर भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला़ काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षावर टीका करून स्वबळावर जयसिंगपूरची निवडणूक लढविण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन आमदार हाळवणकर यांनी केल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत़ जयसिंगपूर-वाडी रस्ता पालिकेकडे हस्तांतरण मंजुरीवरून भाजप व सत्ताधारीमध्ये या कामाचा चांगलाच श्रेयवाद जुंपला असतानाच आमदार उल्हास पाटील यांच्या प्रयत्नातून कन्यागत महापर्वकाळाच्या निधीतून प्रत्यक्ष रस्ता झाल्याने जयसिंगपूर-वाडी रस्ता हस्तांतरणाच्या श्रेयवादाला तूर्ततरी ब्रेक मिळाला आहे़ येणाऱ्या काळात भाजप व सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे़ महाडिक गटाकडूनही राजकीय डावपेच सुरू झाले आहेत़ खासदार, आमदारांची भूमिकाखासदार राजू शेट्टी व आमदार उल्हास पाटील जयसिंगपूर निवडणुकीत कोणती भूमिका घेतात, याकडेही शहरातील राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे़ केडीसीसी निवडणुकीत यड्रावकर यांना ‘स्वाभिमानी’ने मदत केली होती़ शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून स्वाभिमानीकडून भाजपवर टीका केली जात आहे़ मित्रपक्ष असणारा स्वाभिमानी पक्ष जयसिंगपूर पालिका निवडणुकीत भाजपसोबत जाणार? की स्वतंत्र निवडणूक लढविणार तसेच शिवसेनाही स्वतंत्र निवडणूक लढणार का? हा देखील चर्चचा विषय आहे़
जयसिंगपूरच्या सत्तेसाठी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
By admin | Published: April 24, 2016 11:10 PM