दादा खोत - सलगरेकर्नाटक राज्याच्या सीमेवरील पांडेगाव, शिरूर, खिळेगाव व अळट्टी या गावांनी आणि पर्यायाने ‘कन्नड’ भाषेने तीन्ही बाजूंनी वेढलेल्या महाराष्ट्रातील सीमावर्ती चाबुकस्वारवाडी (ता. मिरज) या ‘मराठी’ खाडीला जपण्याचे काम येथील जिल्हा परिषद शाळा करीत आहे. मराठी जपण्याच्या आणि वाढविण्याच्या शाळेच्या प्रयत्नात ‘लोकमत’चा ‘संस्काराचे मोती’ हा उपक्रम मैलाचा दगड ठरला आहे.अवघ्या हजाराच्या घरात लोकवस्ती असलेल्या या गावात एकही हॉटेल, रुग्णालय, औषध दुकान, बॅँक, पतसंस्था, वीज-दूरसंचारसारखी कार्यालये नाहीत, कॉलेज नाही, गावाला सकाळी आणि सायंकाळी अशा दोनच बसफेऱ्या, इतकेच काय मुक्काम चाबुकस्वारवाडी आणि पोस्ट सलगरे अशा स्थितीत येथे कोण्या दैनिकाचा वृत्तपत्र वाटणारा आणि एजंटही नसताना येथील शिक्षक व पालकांच्या सकारात्मक, विचारांच्या प्रयत्नाने येथील विद्यार्थी ‘लोकमत’ संस्काराचे मोती योजनेच्या निमित्ताने तीन महिने का असेना, पण सहभागी होतात. चाबुकस्वारवाडी हे गाव तीन्ही बाजूंनी कन्नड भाषेने वेढले आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या घरी कन्नड भाषेतून संवाद सुरू असतो. अशा ‘मराठी’साठी प्रतिकूल परिस्थितीतही येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक मराठी रुजविण्यासाठी व वाढविण्यासाठी प्रयत्नशील असतात. तीन वर्षांपूर्वी ‘लोकमत’च्या संस्काराचे मोती या स्पर्धेत ५० विद्यार्थी सहभागी झाले होते. ज्या विद्यार्थ्यांच्या वृत्तपत्राचे अर्धे पैसे शिक्षकांनी भरले होते, त्या समरजित नरुटे याला बक्षीस योजनेच्या ड्रॉमध्ये तब्बल २१ हजारांचे बक्षीस मिळाले. बक्षिसाची रक्कम मिळाल्यानंतर त्याने शिक्षकांनी भरलेले १०० रुपये साभार परत केले होते. त्यानंतर दुसऱ्या वर्षीही चाळीस विद्यार्थ्यांच्या सहभागासह संस्काराच्या मोतीने वाचनात आणि हमखास बक्षीस मिळालेल्या रामबंधु लोणच्याने जेवणात रंगत आणली, अशी प्रतिक्रिया येथील विद्यार्थी देतात. यंदा गावात पावसाअभावी दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. तरी येथील वीसभर विद्यार्थी यंदाही सहभागी असून शाळेच्या दर्शक फलकावर ‘लोकमत’चे संस्काराचे मोती हे पान वाचनास खुले करण्यात येत आहे. येथील पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सजगतेमुळे येथे वृत्तपत्र वाचनासारख्या उपक्रमाबरोबरच अन्य उपक्रमातही सक्रिय सहभाग असतो. गतवर्षी येथे लोकवर्गणीतून ई-क्लाससाठी प्रोजेक्टर खरेदी केला आहे.यावर्षी सातवीच्या विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव पालकांनी ई-क्लासला पसंती दर्शवित सर्वांनी वर्गणी काढून ई-क्लासचे सॉफ्टवेअर खरेदी करून ई - लर्निंग सुविधा निर्माण केली आहे. यामध्ये शिक्षक सूर्यकांत नलवडे, देवेंद्र गावंडे, मारुती हुलवान, आशा देवमाने, अशोक वाघावकर, दादासाहेब खोत, प्रवीण जगताप व मुख्याध्यापक सुखदेव वायदंडे यांचा महत्त्वाचा वाटा आहे.येथील मराठी विषयशिक्षक प्रवीण जगताप यांनी मराठी विषयास पूरक असे लोकसाहित्य संग्रह, इंटरनेटवरून माहिती संग्रह, कात्रण संग्रह, परिपाठात आलटून पालटून म्हणी, वाक्प्रचार, कवितांचे, वर्तमानपत्रातील वाचनीय सदरांचे सादरीकरण, हस्ताक्षर सुधार प्रकल्प असे चार वर्षात वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. याचाच एक भाग म्हणून वाचनसंस्कारासाठी ‘लोकमत’च्या योजनेत विद्यार्थी सहभागी होत असतात.‘लोकमत’चा अंक उपलब्धचाबुकस्वारवाडी येथील लोक दैनंदिन बाजार व कामाच्या निमित्ताने जवळच तीन कि.मी.वर असणाऱ्या सलगरे येथील बाजारपेठेत जातात तेंव्हा तिथे त्यांना सर्व दैनिके वाचायला मिळतात. गरज वाटल्यास ते दैनिक सायंकाळी घरी जाते. मात्र अन्य कोणत्याही दैनिकाचा नियमित अंक येथे उपलब्ध होत नसताना, ‘लोकमत’च्या संस्काराचे मोती योजनेतून तीन महिने का असेना पण नियमित अंक उपलब्ध होत आहे.
‘कन्नड’च्या वेढ्यात मराठीची जपणूक
By admin | Published: July 25, 2014 11:09 PM