कोल्हापूर : पापाची तिकटी ते महाराणा प्रताप चौकपर्यंत थरारक पाठलाग करून अरुंद बोळात गाठून तरुणावर चाकू व बांबूने हल्ला करण्याचा प्रकार घडला. या हल्ल्यात श्रीकांत मधुसूदन होनकळसे (वय ३१, रा. शास्त्रीनगर) हा तरुण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात शिवराज चंद्रकांत पोवार (वय २८, रा. सोमवार पेठ) व अन्य दोन अनोळखी अशा तिघा संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे. दोघांची चर्चा सुरू असताना मध्यस्ती केल्याच्या रागातून हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, शास्त्रीनगरातील श्रीकांत होनकळसे हा तरुण गुरुवारी रात्री मित्राच्या पानटपरीवर गेला होता. तेथे तो मित्रासोबत चर्चा करत होता. त्यावेळी संशयित शिवराज पोवार तेथे आला. त्याने त्यांना ‘काय सांगत बसलाय’ असे म्हणाला. यावरून त्या दोघांत शाब्दिक वादावादी झाली. शिवराजने मोपेडच्या डिकीतील धारदार चाकू काढला, त्यावेळी श्रीकांत होनकळसे याच्या लक्षात आल्याने त्याने तेथून पळ काढला. त्यावेळी शिवराज हा हातात चाकू घेऊन तर त्याचे दोन साथीदार मोपेडतून त्याचा पाठलाग करत होते. त्यांनी श्रीकांतचा पापाची तिकटी, पानलाईन, माळकर तिकटी ते महाराणा प्रताप चौकापर्यंत पाठलाग केला. त्यांनी त्याला अरुंद गल्लीत गाठून त्याच्यावर चाकूने व बांबूने हल्ला केला. लाथाबुक्क्यांनीही मारहाण केली. या हल्ल्लात श्रीकांत होनकळसे हा गंभीर जखमी झाला. हल्लेखोर पळून गेले. या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा दिलेल्या तक्रारीवरून संशयित शिवराजसह त्याच्या दोघा साथिदारांवर प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा नोंद झाला.