कोल्हापूर : खरी कॉर्नर, न्यू महाद्वार रोड येथील आनंद फोटो स्टुडिओचे मालक आनंदराव दत्तात्रय चौगले (वय ६५, रा. पोवार गल्ली, मंगळवार पेठ) यांच्या आत्महत्येच्या धक्क्यातून त्यांचे कुटुंबीय अद्याप सावरलेले नाही. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने पत्नी सुरेखा, मुलगी विद्या, मुलगा विवेक व भाऊ दिनकर चौगले हे सर्वजण मानसिक तणावाखाली आहेत. पोलिसांनी त्यांचे इन्कमटॅक्स रिटर्नची सही असणारी पावती व पर्सनल डायरी कुटुंबीयांकडून ताब्यात घेतली आहे. त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीतील हस्ताक्षर त्यांचेच आहे का, हे तपासण्यासाठी आज, सोमवारी चिठ्ठीसह पावती व डायरी पुणे येथील हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठविले जाणार आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख यांनी दिली. आनंदराव चौगले यांनी न्यू महाद्वार रोडवरील ‘आनंद फोटो स्टुडिओ’मध्ये शनिवारी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यावेळी त्यांनी भाजपचे नेते व विद्यमान नगरसेवक आर. डी. पाटील, त्यांची दोन मुले व महापालिका सफाई कामगार धनाजी शिंदे यांच्या वारंवार धमक्यांमुळे आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवलेली पोलिसांना मिळाली होती. त्यावरून शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आंदोलन करून संशयितांना अटक करण्याची मागणी केली होती. त्यामुळे या आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण लागल्याने राज्यभर खळबळ माजली. पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता ते अद्याप या धक्क्यातून सावरलेले नाहीत. चौगले यांना श्लोक लिहिण्याचा छंद होता. त्यांनी वैयक्तिक डायरी संग्रही ठेवली होती. या डायरीसह त्यांची इन्कमटॅक्स रिटर्नची सही असणारी पावती पोलिसांनी ताब्यात घेतली. डायरीतील हस्ताक्षर, पावतीवरील सही व त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतील हस्ताक्षर व सही यांचे नमुने तपासण्यासाठी आज, सोमवारी पुणे येथील हस्ताक्षरतज्ज्ञांकडे पाठविले जाणार आहेत. त्याचा अहवाल चार दिवसांत प्राप्त होईल. त्यामध्ये हस्ताक्षर मिळते-जुळते असल्यास चिठ्ठीतील संशयित व्यक्तिंच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलीस निरीक्षक देशमुख यांनी सांगितले. शनिवारी रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवारी दिवसभर नातेवाईक, मित्रपरिवाराची त्यांच्या घरी वर्दळ होती. (प्रतिनिधी) विश्वास आहे, पोलीस न्याय देतील ४आमचे वडील नेहमी प्रसन्न चेहऱ्याने हसत-खेळत असायचे. शुक्रवारी दिवसभर त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव दिसत नव्हता. रात्री जेवण करून ते झोपले. नेहमी ते पहाटे सहा वाजता फिरायला जात होते. शनिवारी मात्र पहाटे पाच वाजता बाहेर पडले. ते जीवनाचा अशा पद्धतीने शेवट करतील, असे आम्ही स्वप्नातही पाहिले नव्हते. त्यांचे कोणाशीही आर्थिक व्यवहार झालेले नाहीत. ४त्यांच्यावर कोणतेही कर्ज नाही. त्यांचे सर्वांशी चांगले संबंध होते. कुटुंबामध्येही वाद होत नव्हता. भाऊ विवेक याचे चार महिन्यांत लग्न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. घरामध्ये सगळं काही व्यवस्थित होते. त्यांच्यावर कोणाचे दडपण आहे, असे त्यांनी आम्हाला कधी सांगितले नाही. ४त्यांनी आत्महत्या कोणत्या कारणातून केली, याचा उलगडा पोलीसच करतील. आम्हाला विश्वास आहे, पोलीस आमच्या कुटुंबाला न्याय देतील, अशी भावना मुलगी विद्या चौगले हिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
चौगले कुटुंबीय तणावाखाली
By admin | Published: November 02, 2015 12:48 AM